अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी

File Photo

अजित पवार : लोकशाहीमध्ये दडपशाही, हुकुमशाहीची भाषा

पुणे – देशात सध्या बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरू आहे. बोललं एक जात आणि कृती वेगळी केली जाते. आपले पंतप्रधान स्वत:ला “प्रधानसेवक’ तर मुख्यमंत्री “मुख्यसेवक’ म्हणून घेतात. मात्र, त्यांच्या वागण्या, बोलण्यातून कोठेच सेवकांचा भाव दिसत नाही. उलट लोकशाहीमध्ये दडपशाही आणि हुकुमशाहीची भाषा बोलली जात असून, आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी हे राज्यकर्ते करत आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, सभापती प्रवीण माने, सभापती सुरेखा चौरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला प्रदेशाध्यक्ष नलवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. “बेटी बचाव व बेटी बढावं’ कार्यक्रमांतर्गत “गुड्डा-गुड्डी’ फलकाचे अनावरण करण्यात आले.

पवार म्हणाले, ग्रामविकास विभागाचे काम सरकारच्या जीवावर नाही तर अंगणवाडी सेविकांच्या जीवावर चालते. उद्याचा सशक्त, समर्थ आणि मजबूत समाज घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. तटपुंज्या मानधनात ते काम करत असतात. राज्यात 2 लाख 8 हजार सेविका असून, अन्य राज्यात 10 हजारांवर सेविकांना मानधन दिले जाते. परंतु, आपल्याकडे मानधनासाठी सेविकांना आंदोलन करण्याची वेळ येते. त्यामुळे अशी बोळवण करणाऱ्या सरकारच काय करायचं हे तुम्हीच ठरावा. असे सूचक विधान करत, तुम्ही मनात आणलं तर पुढच्या वर्षी हे चित्र बदलू शकते याची जाणीवही पवार यांनी करून दिली. तसेच उद्या जनतेने संधी दिली तर दादा जो बोलतो ते करून दाखवतो याची प्रचिती एका वर्षाच्या आत येईल, असा शब्द तुमच्या सर्वांच्या साक्षिने देतो, असेही पवार यांनी सांगितले.

मांढरे म्हणाले, ग्रामपंचायत किंवा इतर ठिकाणी गेल्यावर तेथील नकारात्मक कामामुळे नाईलाजास्तव कारवाई करावी लागते. मात्र, अंगणवाडीत गेल्यावर समाधान मिळते. कुपोषणाच्या प्रश्‍नावर अंगणवाडीने चांगले काम केले आहे. लवकरात लवकर 100 टक्‍के अंगणवाड्यांना नळ आणि वीज जोड देऊन अंगणवाड्या ई-फ्लॅटफॉर्मवर आणण्यात येतील. बालकांच्या शरिराबरोबरच बौद्धीक विकास व्हावा, या दिशेने काम सुरू आहे. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर आभार दीपक चाटे यांनी मानले.

निकृष्ट दर्जाचा पोषण आहार बदलावा…
जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील बालके आणि स्तनदा मातांना मिळणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे आहारात बदल करून तो चांगल्या दर्जाचा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे अनेक पत्रव्यवहार केले. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. “थोडा द्या पण चांगला द्या’ अशी भावना सर्वांची आहे. तसेच अंगणवाड्यांतील रिक्त जागा भरव्यात अशी मागणी सभापती राणी शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी याबाबत सभागृहात प्रश्‍न उपस्थित करून, अंगणवड्या सेविकांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसेच पोषण आहाराबाबतही चर्चा करू असे पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)