अद्रमुकचे सदस्य धावले कॉंग्रेसच्या अंगावर

तहकुबीनंतर लोकसभेत हंगामा
नवी दिल्ली – लोकसभेचे कामकाज तहकुब झाल्यानंतर आज सभागृहात आगळाच गोंधळ पाहण्यास मिळाला. अद्रमुकच्या सदस्यांनी आजही कावेरी लवाद नेमा अशी मागणी करीत सभागृहात गोंधळ घातल्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आले त्यावेळी कॉंग्रेसचे के के वेणुगोपाल यांनी अद्रमुक सदस्यांनी सरकारशी हातमिळवणी करून मॅच फिक्‍सींग केल्याची टिप्पणी केली. त्यावेळी अद्रमुकचे सदस्य कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे आणि वेणुगोपाल यांच्या दिशेने धावले. त्यांनी संतप्तपणे या नेत्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाकीच्या पक्षाचे सदस्य तेथे धावले आणि त्यांनी या सदस्यांना शांत केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याही सभागृहात उपस्थित होत्या. त्यावेळी कॉंग्रेस सदस्यांनी त्यांच्या भोवती कडे केले.

कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेचे कामकाज सुरू राहावे आणि तेथे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास ठरावावर चर्चा व्हावी असा आग्रह धरला आहे पण अद्रमुक सदस्यांनी कावेरी लवाद त्वरीत नेमावा अशी मागणी करीत सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज हाणून पाडले आहे त्यांनी आजही तेच कृत्य केल्याने वेणुगोपाल यांनी त्यांच्यावर मॅच फिक्‍सींगचा आरोप केला. सभागृहातील कामकाज सुरळीतपणे होत नसल्याने आपल्याला अविश्‍वास ठरावावर चर्चा घेता येत नसल्याचे सभापती सुमित्रा महाजन यांनी आजही पुन्हा नमूद केले.

सभागृहाच्या बाहेर आल्यानंतरही कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी अद्रमुकचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला. लोकसभेत अविश्‍वास ठरावावर चर्चा होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाचे नेतेच अद्रमुक सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अविश्‍वास ठरावावर सभागृहात चर्चा झाली तर सरकार अनेक आघाड्यांवर उघडे पडेल हे स्पष्ट असल्याने सरकारची नाचक्की टाळण्यासाठीच अद्रमुकशी हातमिळवणी करून कामकाज हाणून पाडले जात आहे असा आरोप खरगे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)