अत्याचार घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका – जाधव

चिंचवड – अत्याचार आपल्या घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका. योग्य वेळी एक टाका घातला तर पुढचे नऊ टाके वाचतात हे लक्षात घ्या. आपला कोणीतरी उद्धारकर्ता येईल, आवाज उठवेल तोवर वेट अँड वॉच करू ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रतिभा जाधव यांनी येथे केले

चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत स्त्री भ्रूण हत्या आणि महिला अत्याचार या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ऍड. अंतरा देशपांडे होत्या. यावेळी ऍड.ज्योती सोरखेडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शीतल गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समनव्यक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

-Ads-

यावेळी प्रतिभा जाधव म्हणाल्या की, वृत्तपत्रात रोज बलात्काराच्या घटना वाचून आमच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. भवरी देवी, फूलनदेवी, रिंकू पाटील, अमृता देशपांडे, खैरलांजी, कोपर्डी, कठुआ, उन्नाव किंवा वयाच्या 23 व्या वर्षांपासून कोमात गेलेल्या मुंबईतील परिचारीका अरुणा शानबाग प्रकरणांमधून हेच दिसून आले आहे. आम्हाला कशाचेच काही वाटत नाही कठुआ, उन्नाव प्रकरणानंतर काही मंडळींनी जे अकलेचे तारे तोडले ते पाहून प्रचंड चीड आली, असेही त्या म्हणाल्या.

देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी स्त्रीकडे केवळ एक मादी म्हणून पाहण्याचीच आमची मानसिकता अद्याप गेलेली नाही. स्त्रियांवरील बलात्काराच्या घटनांनी हे सिद्ध केले आहे. स्त्री भ्रूण हत्येमागे वंशाला दिवा , हुंडा, मुलगी परक्‍याचे धन याबरोबरच महिलांची असुरक्षितता हेही एक कारण आहे. त्यामुळे महिलांबाबतची समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्याकडे मुलींना लहानपणापासून दुय्यम वागणूक दिली जाते. मुलाला वेगळी खेळणी आणि मुलीला भातुकली साठी भांडीकुंडी हे असले संस्कार लहानपणापासून केले जातात. नोकरी करत असली तरी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले जात नाही. मुलगी हे परक्‍याचे धन, मुलगा म्हणजे कोरा चेक या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन वैशाली खोले यांनी केले, तर आभार सुजाता पोफळे यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)