अत्याचारातील आरोपीची माजी सैनिकाकडून गोळ्या झाडून हत्या

पाथर्डीतील जवखेडे खालसा येथील घटना : मयताच्या वडिलांसह भाऊ-बहीणवर आरोपींचा तलवारीने हल्ला

रायफल व तलवार पोलिसांकडून जप्त

पोलिसांनी हल्लेखोर मामा-भाच्याला अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तळ ठोकून होते. आरोपीने घटनास्थळी टाकलेली तलवार व रायफल पोलिसांनी जप्त केली आहे.

पाथर्डी – तालुक्‍यातील जवखेडे खालसा शिवारात येथे माजी सैनिकाने रायफलमधून गोळ्या झाडून अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या युवकाची हत्या केली आहे. मुख्य आरोपीच्या भाच्याने तलवारीने केलेल्या हल्ल्यात मयत योगेशच्या वडिलांसह भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली आहे.

योगेश एकनाथ जाधव (वय 22), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील एकनाथ जाधव, भाऊ अक्षय आणि बहीण दीपाली हे तलवारीचा वार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनेतील दोघा आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, हल्लेखोर मामा-भाचे आहेत. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मयत योगेश जाधव हा मुख्य आरोपीच्या ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून पूर्वी काम करत होता. आरोपीच्या अल्पवयीन मुलीवर मयत जाधव याने अत्याचार केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तेव्हापासून मयत जाधव पसार होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नगर येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी त्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन कोर्टाची कागदपत्रे सादर केली. योगेश यानंतर जवखेडे शिवारात असलेल्या आपल्या घरी आला. तिथे आरोपी मामा-भाचा जवखेडे शिवारात पोहचले.

मुख्य आरोपीकडे त्यावेळी रायफल, तर आरोपीच्या भाच्याकडे तलवार होती. मुख्य आरोपी योगेशच्या घरात प्रवेश करताच योगेशच्या मानेवर गोळी झाडली. यात योगेशचा जागेवरच मृत्यू झाला. मयत योगेशचे वडील एकनाथ पुढे सरसावले. त्यावेळी आरोपीचा भाच्याने एकनाथ यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला.

एकनाथ यांच्या डोक्‍यावर त्याने तलवारीने वार केला. दुसरा वार एकनाथ यांनी हातावर झेलला. आरोपीला पकडण्यासाठी मयत योगेशचा भाऊ अक्षय आणि दीपाली पुढे आले. त्यावेळी मुख्य आरोपीचा भाच्याने त्यांच्यावरही तलवारीने वार केले. या हे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या झटापटीत आरोपीही जखमी झाला आहे. मयत योगेशचे जखमी वडील एकनाथ, भाऊ अक्षय आणि बहीण दीपाली हे जखमी असून, त्यांना उपचारासाठी नगरमध्ये दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)