अत्याचारप्रकरणी आईचा अटकपूर्व जामीन फेटाळला : हडपसरमध्ये मुलाला मदत केल्याची घटना

पुणे – भाडेकरून म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास पोटच्या मुलाला मदत केल्याप्रकरणात आईचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी हा आदेश दिला आहे. बसंतीसिंग टाक (रा. हडपसर), असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात तिचा मुलगा जग्गुसिंग टाक आणि त्याचा मित्र समंदरसिंग टाक या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. पीडित 14 वर्षीय मुलीने याबाबत हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2016 पासून आतापर्यंतच्या कालावधीत हडपसर भागात घडली. फिर्यादी ही कुटुंबीयांसह टाक यांच्या खोलीत भाड्याने राहत होती. बसंतीसिंग हिने मुलगा जग्गुसिंग याला फिर्यादीवर बलात्कार करण्यास मदत केली. त्यानंतर त्याच्या मित्रानेही फिर्यादीवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात बसंतीसिंग हिने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे बसंतीसिंग हिला अटक करून तिच्याकडे तपास करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा, असा ऍड. पाठक यांनी केलेला युक्‍तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)