अतिरिक्‍त आयुक्‍त पद रिक्‍तच

पिंपरी – महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर असतानाही या जागेवर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही. या रखडलेल्या नियुक्‍त्यांमागे गौडबंगाल असून त्याची चौकशी करावी. तसेच या दोन्ही पदांवर अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेला ब वर्ग दर्जा प्राप्त आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची दोन पदे मंजूर आहेत. परंतु, महापालिकेतील दोन्ही पदे रिक्त असूनही सरकारकडून या जागेवर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही.

या उलट प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रवीण अष्टेकर यांना महापालिकेत केवळ त्यांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी असलेल्या हित संबंधामुळे उमेद मान्यतेवर पात्रता नसतांनाही अग्निशामक, उद्यान, भांडार, शिक्षण समिती आणि माहिती व तंत्रज्ञान अशा प्रमुख विभागाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त म्हणून सोपविला आहे. या विभागाची चोख जबाबदारी सक्षमपणे अतिरिक्त आयुक्त म्हणून अष्टेकर यांच्याकडून पार पाडली जात नाही. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. याशिवाय त्यांच्याकडून विकास कामाच्या फाईल जाणूनबुजून रखडून ठेवण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

गेल्या सहा महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पदाच्या दोन्ही जागा रिक्त आहेत. राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. सरकारकडे या पदासाठी पात्र असलेले अधिकारी उपलब्ध नाहीत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रखडलेल्या नियुक्‍त्यांमागे काही गौडबंगाल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या संदर्भात राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात यावेत. तसेच तातडीने दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करावी, असे ननावरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)