अतिरिक्त आयुक्तपदी डॉ.विपीन शर्मांची नियुक्ती

तिसऱ्या रिक्तपदावर नियुक्ती


पालिका अधिकाऱ्यांना बढती नाहीच


पुणे :  पुण्यात साखर आयुक्त, शिक्षण आयुक्त आणि त्यानंतर मेडाचे महासंचालक म्हणून काही महिने जबाबदारी सांभाळलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्‍तांची पदे असून पहिल्यांदाच शासनाकडून तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. शर्मा यांची नियुक्ती महापालिकेतील कारभार सुरळीत करण्यासाठी शासनाकडून केली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात ही जागा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बढतीने देण्यासाठी मंजूर केली आहे. त्यामुळे डॉ. शर्मा यांच्या नियुक्तीने अतिरिक्त आयुक्तांच्या शर्यतीत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. तसेच डॉ. शर्मा यांच्या नियुक्तीनंतर अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या सुधारीत सेवा नियमावलीनुसार, पालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. त्यात दोन पदांवर मागील वर्षी अतिरिक्त आयुक्त शितल उगले, तर यावर्षी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर तिसरे अतिरिक्त आयुक्तपद भरण्याची मागणी केली होती. सेवा नियमावलीमधील तरतुदीनुसार महापालिकेने या पदासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची कागदपत्रे घेतली होती. तसेच त्यांच्या नावाची शिफारसही 2016 ला राज्य शासनाकडे केली होती. असे असतानाच डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त आयुक्त होण्याच्या स्वप्नाला धक्का बसणार आहे.

डॉ. शर्मा हे 2005 च्या आयएसएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी पुण्यात साखर आयुक्तपदाची जबाबदारी सांभळल्यानंतर त्यांची बदली राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये त्यांची बदली पुन्हा “मेडा’मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात त्यांची मेडामधूनही बदली होती. त्यानंतर ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. त्यानंतर आता त्यांची पुन्हा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

बदली सुरळीत कारभारासाठी की, उगलेंना शह देण्यासाठी
महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे भाजपने सह्यांची मोहीम राबवून उगले यांच्या बदलीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. मात्र, उगले यांच्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळेच केल्याने शासनाकडून उगले यांच्या बदलीबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्यांची बदली नाही केली, तर त्यांचे पदभार कमी करावेत असा आग्रह धरला आहे. त्यामुळे उगले यांचे सर्वच पदभार अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना देऊ शकत नाहीत. त्यामुळे डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करून उगले यांच्याकडील आणखी काही खात्यांचे काम कमी केले जाणार आहे. त्यामुळे शासनाकडून अप्रत्यक्षपणे उगले यांचे पंख छाटून त्याच्या बदलीची मुळे रोवली जात असल्याची चर्चा महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)