बाजारातील वाहतुक कोंडी कमी
आंब्याची आवक वाढली : भावात घसरण
पुणे- मार्केट यार्डातील फळ विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रत्नागिरी आंब्याची आवक दुप्पट झाली आहे. तर कर्नाटकातून होणारी आंब्याची आवक वाढली आहे. अतिरिक्त आवक ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले शेड वापरण्यास व्यापाऱ्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील वाहतुक कोंडी कमी झाली आहे.
बाजारात दरवर्षी आंब्याची मोठी आवक होत असते. त्यामुळे सहाजिकच येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. त्याचा फटका किरकोळ विक्रेते असलेले खरेदीदार, सर्वसामान्य नागरिकांना होत असते. या पार्श्वभूमीवर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बाजार समिती यावर्षी जनावर बाजाराच्या बाजूला 20 हजार स्क्वेअर फुट शेड उभारले आहे. ये शेडमध्ये व्यापाऱ्यांना अतिरिक्त झालेली आवक ठेवता येणार आहे. व्यापाऱ्याला सुरूवातीला त्याच्या गळ्यावर, त्यानंतर गाळ्यापासून 15 फुट जागेत माल ठेवता येणार आहे. हे भरल्यानंतर अतिरिक्त आलेला माल शेडमध्ये ठेवता येणार आहे. विशेषत: कर्नाटक हापूसची मोठी आवक होत असते. कर्नाटक आंब्याचा व्यापार करणाऱ्यांना याचा जास्त लाभ होणार आहे. या शेडमध्ये आंबा ठेवण्यास व्यापाऱ्यांनी सुरूवात केली आहे. गुरूवारी मोठ्या प्रमाणात आंबा ठेवण्यात आला आहे. याविषयी आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, नवीन शेडमुळे येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटेल. येथील वाहतुक कोंडीमुळे शेतकरी मुंबईला माल पाठविण्यास पसंती देत. मात्र, बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याचा फायदा होईल. व्यापार वाढेल. पुण्यातील आवक वाढेल. भरून आलेल्या ट्रक लवकर मोकळ्या होतील. शेतकऱ्यांना भावही जास्त मिळेल.
आंब्याच्या भावात घसरण
मागील आठवड्याच्या तुलनेत रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात दररोज तीन ते साडेतीन हजार पेटी आंब्याची आवक होत असते. आता त्यामध्ये वाढ झाली आहे. गुरूवारी बाजारात साडेपाच ते सहा हजार पेटी आवक झाली. तर कर्नाटक येथून गेल्या आठवड्यात 20 हजार पेटी आवक होत होती. ती आता 25 हजार पेट्यांपर्यंत पोहोचली आहे. रत्नागिरी हापूसच्या पेटीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 500 रुपयांनी घट झाली आहे. तर कर्नाटक हापूसच्या डझनामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या कच्च्या, तयार हापूस आंब्याच्या 4 ते 7 डझनाच्या पेटीला अनुक्रमे 1200 ते 2500 रुपये आणि 1500 ते 3500 रुपये भाव मिळत आहे. कर्नाटक हापूसच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीस 800 ते 1400 रुपये, तर पायरीच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीस 600 ते 800 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे आणि रोहन उरसळ यांनी दिली.
बाजार आवारातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने शेड उभारून अतिरिक्त आंबा ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे केवळ सेस स्विकारली जाणार आहे. ज्यांची अतिरिक्त आवक असेल. त्यांना तेथे आंबा ठेवता येणार आहे. ही जागा वापरण्यास सुरूवात झाली आहे.
दिलीप खैरे, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा