अतिप्रसंगाच्या घटनेनंतर फलटणमध्ये जनक्षोभ

परप्रांतियांकडे रेशनकार्ड सापडल्यामुळे “महसूल’च्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह
अजय माळवे
फलटण, दि. 30 –
परप्रांतीय युवकाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या घटनेनंतर फलटणमध्ये परप्रांतियांविरुद्ध जनक्षोभ निर्माण झाला आहे. त्यातच काही परप्रांतियांकडे रेशनकार्ड सापडल्यामुळे महसूल खात्याच्या विश्‍वासार्हतेबद्दलही प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही परप्रांतियांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या कारणावरुन फलटणमध्ये परप्रांतिय युवकावर पोक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवकास फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवार, दि. 28 रोजी सोमवार पेठ, फलटण येथे दुपारी 3.30 वाजता पप्पूसिंग बचपणसिंग चितोडीया (वय 25) याने एका अल्पवयीन मुलीला तुला खाऊ देतो तू माझ्या बरोबर चल असे म्हणत त्या मुलीचा हात पकडून वाईट हेतूने तिला ओढू लागला यावेळी त्या मुलीने हिसका देऊन आपली सुटका करत ती घाबरून पळून आली. तिने घडलेला प्रकार मामाला सांगितला. यानंतर तो युवक कारखाना रोडने चालत जात असल्याचे समजले. त्याचा शोध घेतला असता, तो सापडला. त्या अल्पवयीन मुलीने त्याला ओळखले. तेथील लोकांनी त्यास खूप चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याने कोळकी ता. फलटण येथे आयुर्वेदिक औषधे (जडीबुटीया)चे पाल टाकले असल्याचे समजते. पोलीस या प्रकाराचा तपास करीत आहेत.
फलटण येथे परराज्यातील युवक खूप मोठ्या प्रमाणात कामाला आले आहेत. या घडलेला प्रकाराने फलटण शहरात व ग्रामीण भागात मुलांना पकडून नेऊन त्यांच्या किडनी काढण्यात येतात, असा मेसेज सोशयल मीडियावर फिरत असल्याने पोलिसांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. मागच्या दोन दिवसात अलगुडवाडी आसू रोडला राजस्थानी दोन युवकांना जबर मारहाण झाली होती. यावेळीही असेच काहितरी असेल म्हणून लोकांनी वॉट्‌सऍपवर व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याने फलटण शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून फलटण शहरासह ग्रामीण भागात परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात वास्तव्य केले आहे. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असून ज्या लोकांनी परप्रांतीय लोकांना राहण्यासाठी जागा किंवा घरे दिली आहेत, त्यांनी पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असतानाही एकानेही शहर किंवा ग्रामीण पोलिसात माहिती दिली नाही. यामुळे हे असले छेडछाडीचे प्रकार वाढत चालले आहेत.
कोळकी (ता. फलटण) येथे अल्पवयीन मुली जात असताना एका वेटरने मुलींना लज्जा उत्पादित होईल, असे वर्तन केले होते. तसेच त्या नंतर एका वेटरने अपरात्री महिलेला फोन करून त्रास दिला होता, असे एक ना अनेक गुन्हे कोळकीमध्ये होत असताना याकडे कोणच गांभीर्याने लक्ष देत नसल्याची भावना सर्व सामन्यात होत आहे. सगळ्यात कहर म्हणजे कांही परप्रांतियांकङे रेशनिंग कार्ङ मिळून आल्याने महसूल खात्याच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वेळीच या परप्रांतियांना रोखा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)