अतिक्रमण पथक केवळ शोभेपुरते!

पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत विक्रेत्यांवर केली जाणारी कारवाई निव्वळ फार्स आहे का? असे चित्र भोसरीत पहायला मिळाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकाची रस्त्याच्या कडेला केवळ कुलुप बंद गाडी पहायला मिळाली. विशेष म्हणजे या गाडीसमोरच दोन अनधिकृत फेरीवाले आपला व्यवसाय निवांतपणे करताना आढळून आले. यामुळे याठिकाणाहून ये-जा करणारे नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करीत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाची विविध भागांत कारवाई होत असते. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या भोसरीतील राष्ट्रमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली व महामार्गावर सर्वाधिक अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत असतात. महामार्गावरील चांदणी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. यामुळे पादचाऱ्यांना पायी चालणे देखील मुश्‍किल होत असते. याशिवाय या महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे असून, सायंकाळी प्रवासी भरण्यासाठी याच महामार्गावर लक्‍झरी बस उभ्या केल्या जात असल्याने, दररोज रात्री उशिरापर्यत या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. याबाबत अनेकदा तक्रार करुनही याकडे महापालिका प्रशासन आणि भोसरी वाहतूक विभागाकडून सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते.

-Ads-

महिनाभरातून एखाद्या वेळी या मार्गावर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईची बहुतांशी अनधिकृत फेरवाल्यांना अगोदरच टीप मिळत असल्याने या कारवाईदरम्यान हे विक्रेते आपली हातगाडी घेऊन, काही वेळ नजीकच्या गल्ली-बोळांमध्ये व्यवसाय करताना दृष्टीस पडतात. काही वेळाने अतिक्रमणविरोधी पथक गेल्यानंतर हे विक्रेते पुन्हा आपल्या जागेचा ताबा घेतात. खासगी ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडीत भर पडत असली, तरीदेखील वाहतूक पोलिसांना याचे काही सोयरे-सुतक नाही. याशिवाय या उड्डाणपुलाखाली असलेले अनधिकृत दुचाकी व चारचाकींचे वाहनतळ या समस्येत आणखी भर घालत आहे. हे कमी की काय म्हणून पुलाखालील प्रत्येक चौकात स्वयंघोषित रिक्षा व तीन अन्य वाहनांच्या संघटनांनी संघटनो स्टॅण्डच्या नावाखाली जागा बळकाविली आहे. पुलाखालील चौकात उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.

या मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांचा व महामार्गावरील गाळेधारक व्यावसायिकांचा हातगाड्या उभ्या करण्यावरुन अनेकदा वादाचे प्रसंग उद्‌भवले आहेत. मात्र, तरी देखील या अनधिकृत फेरीवाल्यांवर लुटीपुटीच्या कारवाईशिवाय कोणतीही कारवाई झालेली ऐकिवात नाही. मुख्यमंत्री अथवा एखादा वजनदार मंत्री या परिसरातील एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्यास, काही तास या मार्गावरील अतिक्रमण हटविले जाते. त्याकरिता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि भोसरी वाहतूक विभाग अत्यंत कार्यक्षमपणे आपली जबाबदारी चोखपणे बजावतात. मात्र आता तर अतिक्रमणविरोधी पथकाच्या वाहनासमोरच नाकावर टिच्चून अनधिकृत विक्रेते व्यवसाय करत असतल, तर सर्वसामान्य नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडून कोणती आशा बाळगावी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)