अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

वाकड – भर रस्ता व फूटपाथवर अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाईत ग-क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने 36 हातगाड्या, चार स्टॉल्स आणि विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य जप्त केले.

क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्या धडक करवाईच्या सूचनेनुसार रहदारीस अडथळा ठरणारे बेशिस्त फेरीवाले, फळ व भाजी विक्रेते यांची चांगलीच धांदल उडाली. काळेवाडी रोडवरील डी-मार्ट, तापकीर चौक, धनगर बाबा मंदिर परिसर, काळेवाडी फाटा, सोळा नंबर बस स्टॉप, डांगे चौक येथे एकाच वेळी कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय अधीक्षक श्रीकांत कोळप, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी ही कारवाई केली.

डांगे चौक रोड, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, पिंपरी रोड या ठिकाणी प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. या रोडवरील वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. त्यातच या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, फळभाज्या विक्रेते, हातगाड्या यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होतो. नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या विरोधात वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.

अशी झाली कारवाई
काळेवाडी डी-मार्ट समोरील रस्त्यावरून 10 हातगाड्या, रहाटणी फाटा चौक येथून 5 हातगाड्या, सोळा नंबर बस स्टॉप येथून 6 हातगाड्या व 1 चायनीज स्टॉल, डांगे चौक पुलाखालील कलिंगड शेड यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुन्हा सायंकाळच्या वेळेस रहाटणी फाटा, धनगर बाबा मंदिराजवळील 7 हातगाड्या व दोन खाऊचे स्टॉल्स जप्त करण्यात आले. एकूण 36 हातगाड्या, स्टॉल्स व विक्री करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करुन महापालिकेच्या नेहरूनगर गोडाऊनमध्ये जमा केले. अतिक्रमण पथकासोबत कार्यालय अधीक्षक श्रीकांत कोळप, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, अतिक्रमण निरीक्षक मुगटराव सावंत, मुख्य लिपिक सतीश लांडगे, सतीश औटी, महादेव साबळे, नरेश कुमार इदनानी, गौतम बाराथे व अतिक्रमण पथकाचे 7 मजूर कारवाईत सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिक्रमण मुख्य कार्यालयाकडील दिलीप शिंदे, सहाय्यक फौजदार, 5 महिला पोलीस कर्मचारी, 7 पुरूष पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

फेरीवाल्यांकडून रस्ते हायजॅक
रहाटणी चौक, तापकीर चौक, सोळा नंबर बस स्टॉप, डांगे चौक येथे फळ-भाजी विक्रेते, विविध हातगाड्या अक्षरश: रस्ते हायजॅक करतात. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. या कारवाईमुळे निदान काही दिवस तरी नागरिकांची त्रासातून सुटका होईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्‍त होत आहे. महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा अशा प्रकारची धडक कारवाई झाल्यास अतिक्रमणास चाप बसेल, अशी अपेक्षाही स्थानिकांनी व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)