अतिक्रमणे हटवून पाच फुटांचे रस्ते करावेत

दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आरपीआयची मागणी

पुणे – पाटील इस्टेट झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमधील अतिक्रमणे हटवून किमान पाच फुटांचे रस्ते करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच विद्युत तारांचे जाळे व्यवस्थित करण्याचे आदेश महावितरण व पालिकेच्या विद्युत विभागाला द्यावे, या मागणीचाही त्यात समावेश आहे.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.

शहराच्या 4 टक्‍के भागांत झोपडपट्टी असून, त्यात 42 टक्‍के नागरिक अतिशय दाटीवाटीने राहतात. या वस्त्यांमध्ये तीन महिन्यांतून मोठी आग लागण्याच्या घटना घडतात. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची वाहने जाण्याइतकीही जागा नसते. त्यामुळे वस्त्यांमधील गल्लीबोळातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश आयुक्तांनी गलिच्छ वस्ती निर्मुलन विभागाला द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. शॉर्ट सर्किट हे आग लागण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील वायरींचे जाळे व्यवस्थित करण्याच्या सूचना महावितरण आणि पालिकेच्या विद्युत विभागाला कराव्या, प्रत्येक वस्त्यांमध्ये तातडीने पाहणी करून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या, धोकादायक स्थितीतील झोपडपट्ट्यांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत द्यावी
महापालिकेतर्फे दुर्घटनाग्रस्तांना 15 हजार रुपये निधी वस्तू स्वरुपात दिला जातो. मात्र, हा निधी अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे दुर्घटनाग्रस्तांना निवारा आणि मुलभूत गृहोपयोगी वस्तूंची मदत उपलब्ध करून देण्यासाठी या निधीची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी. यासंदर्भातील ठराव स्थायी समिती आणि आयुक्तांकडे दिल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)