अतिक्रमणांमध्ये अडकला लष्करी रणगाडा

हॉर्न वाजवूनही प्रतिसाद नाही : जवानांनी उतरुन हटविली वाहने


विश्रांतवाडी येथील “टॅंक रोड’वर पथारी व्यावसायिकांचे बस्तान


रणगाडा नेताना करावी लागले तारेवरची कसरत

पुणे – विश्रांतवाडी येथील शांतीनगर चौक ते कळस गावाच्या दरम्यान लष्कारातर्फे साधनसामुग्री वाहून नेण्यासाठी दगडी “टॅंक रोड’ तयार केला आहे. मात्र, या रस्त्यावर पथारी व्यावसायिकांनी अतीक्रमण केल्याने आणि वाहनांनी रस्ता व्यापल्याने रणगाडा नेताना जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. हॉर्न वाजवूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ट्रकमध्ये बसलेल्या लष्करी जवानांनी गाडीतून खाली उतरून ही वाहने हटविली.

खडकी, कळस, विश्रांतवाडी, दिघी, म्हस्केवस्ती आणि शांतीनगर हा लष्कराचा महत्त्वाचा भाग समजला जातो. खडकी येथे लष्कराची छावणी आणि लष्कराला आवश्‍यक असणारी साधनसामुग्री बनविण्यात येत असलेली अॅम्युनिशन फॅक्‍टरी याच भागात असल्याने या भागाला सर्वाधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे हा भाग अतिशय संवेदनशील समजला जातो. ही साधनसामुग्री वाहून नेण्यासाठी लष्कराच्या वतीने विश्रांतवाडी येथील शांतीनगर चौक ते कळस गावाच्या दरम्यान दगडाचा “टॅंक रोड’ तयार केला आहे. हा रस्ता केवळ रणगाडे आणि लष्कराच्या वाहनांसाठी राखीव ठेवला आहे. रणगाडा अथवा लष्करी वाहनांची या मार्गावरून विना अडथळा वाहतूक व्हावी यासाठी या मार्गावर अतिक्रमण होऊ नये ही महापालिका प्रशासनाची आणि विशेषत: अतीक्रमण विभागाची जबाबदारी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, हे वास्तव असतानाच या मार्गावर पथारी व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांनी त्यांचा संसार थाटला आहे. सध्या दिवाळीचा सण सुरू असल्याने या व्यावसायिकांनी हा रस्ता अक्षरश: व्यापला असून या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय पण पायी चालणेही मुश्‍कील झाले आहे. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असतानाच सर्वात शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या लष्कराच्या जवानांनाही या प्रकाराचा मंगळवारी अनुभव घ्यावा लागला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शांतीनगर चौक ते विश्रांतवाडी या मार्गावर एक रणगाडा निघाला होता. या रणगाड्याला मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी रणगाड्याच्या पुढे एक लष्करी ट्रक निघाला होता. मात्र, हा रस्ताच पथारी व्यावसायिकांनी व्यापल्याने आणि रस्त्याच्या मधोमधच दुचाकी आणि अन्य वाहने लावल्याने हा रणगाडा पुढे नेण्यासाठी लष्करी जवानांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, हॉर्न वाजवूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ट्रकमध्ये बसलेल्या लष्करी जवानांनी गाडीतून खाली उतरून ही वाहने हटविली. त्यानंतर तब्बल अर्धा ते एक तासांनी हा रणगाडा मार्गस्थ झाला.

“टॅंक रोड’ हा खास लष्कराच्या वाहनांसाठी तयार केला आहे. त्यामुळे त्यावर अतीक्रमण आणि वाहने पार्किंग करणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो. त्यामुळेच या प्रकाराची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या अनधिकृत व्यावसायिक आणि वाहनचालकांना अधिकाअधिक दंड करण्याच्या संदर्भात महापालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)