अतिउत्साही तरुणांमुळे बिबट्या पिंजऱ्यात अडकेना

मंचर- घोडेगाव-धोंडमाळ (ता. आंबेगाव) येथे नरभक्षक बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याजवळ शनिवारी (दि. 6) रात्री 8 वाजता बिबट्याची मादी आली होती; परंतु काही अतिउत्साही तरुणांनी मोबाईल आणि बॅटरीचा उजेड केल्याने मादीने तेथुन पळ काढला. मादीला पकडण्यासाठी एकुण 3 पिंजरे आणि वनखात्याचे 80 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली.
घोडेगाव गावानजीक भीमाशंकर रस्त्यावर धोंडमाळ परिसरात नरभक्षक बिबट्या वाघिणीने धुमाकुळ घातला असून गेल्या दोन दिवसांत अकरा नागरिकांना जखमी केले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवड्यापूर्वी बिबट्या वाघीण तिच्या दोन बछड्यांसह फिरताना काही शेतकऱ्यांनी पाहिले होते; परंतु दोन दिवसांपासून बिबट्या वाघीण एकाच पिल्लासह फिरत आहे. बहुधा तिचे एक पिल्लु हरवल्याने ती सैरभैर होऊन नागरिकांवर हल्ले करीत असल्याचा अंदाज वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी शुक्रवारी (दि. 5) हॉटेल सह्याद्री आणि धोंडमाळ येथे वनखात्याने दोन पिंजरे लावले आहेत. त्यामध्ये मादीला भक्ष्य म्हणून शेळी ठेवली आहे. शनिवारी रात्री शेळीच्या वासाने बिबट्याची मादी धोंडमाळ येथे लावलेल्या पिंजऱ्याजवळ आली होती; परंतु बिबट्याची मादी कशी जेरबंद होते हे पाहण्यासाठी आलेल्या काही अतिउत्साही तरुणांनी पिंजऱ्याच्या दिशेने मोबाईल आणि बॅटरीचा उजेड केल्याने मादीने तेथुन पळ काढला.
राजगुरुनगर, जुन्नर, मंचर आणि घोडेगाव येथील सुमारे 80 वनखात्याचे कर्मचारी धोंडमाळ, हॉटेल सह्याद्री आणि घोडेगाव परिसरात बिबट्या पासून संरक्षण कसे करावे याबाबत जनजागृती करीत आहेत. बिबट्यापासून घ्यावयाची खबरदारी यासाठी ध्वनीफित आणि पत्रके काढुन जनजागृती करण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तिसरा पिंजरा रविवारी (दि. 7) सायंकाळी कॅनॉलजवळ लावण्यात आला आहे. नागरिकांनी पिंजरा लावलेल्या ठिकाणच्या आसपास जाऊ नये, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)