अण्णा हजारे उपोषणावर ठाम

महाजन सकाळी आठ वाजता घेणार भेट

सुपे –ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उद्या (दि. 2) पासून विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांचे आंदोलन सुरू होणार आहे. दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन उद्या सकाळी हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सोमवारी सायंकाळी महाजन राळेगणमध्ये येणार होते; मात्र खराब हवामानामुळे ते येऊ शकले नाहीत. मंगळवारी सकाळी आठ वाजता ते राळेगण येथे येणार आहेत. हजारे यांच्याशी ते पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यापूर्वी दोन वेळा महाजन यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली होती; परंतु त्यातून समाधानकारक तोडगा निघाला नाही. अण्णांच्या मागण्यांपैकी नव्वद टक्के टक्के मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. ठिबक व तुषार सिंचनावरचा जीएसटी 12 ऐवजी पाच टक्‍के करावा, अशी हजारे यांची मागणी होती. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्‍वासन महाजन यांनी दिले होते. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून सरकारने दीडपट भाव जाहीर केला आहे. लोकपाल व लोकयुक्तांच्या नियुक्तीसाठी विशेष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. या महत्वाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत त्याबाबतचे पत्र अण्णांना दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हजारे यांच्या मागील आंदोलनाच्या वेळीही महाजन यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती. दिल्लीतही आंदोलन संपेपर्यत ते सरकार व अण्णांशी मध्यस्थी करत होते. महाजन आज राळेगणमध्ये येऊन काय ठोस आश्वासन देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
अण्णांच्या बरोबर राळेगण सिद्धी परिवार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)