अण्णाद्रमुकचे नेते पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट

नवी दिल्ली : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पनीरसेल्वम यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचेही बोलले जात आहे. पक्षाचे दहा खासदार, नऊ आमदार भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे मोदींनी या भेटीनंतर सांगितले. तसेच तमिळनाडूमधील सद्य राजकीय परिस्थितीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चादेखील झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पनीरसेल्वम यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतीपद निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या प्रादेशिक पक्षांची संख्या तीनवर गेली आहे. याआधी वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते ए. पी. जितेंद्ररेड्डी यांनीही भाजपच्या बाजूने असल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी हेसुद्धा भाजपाला पाठिंबा देण्यात तयार असल्याचेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)