अण्णाद्रमुकचे कार्यालय वापरण्यास शशिकला गटाला मनाई करावी

पन्नीरसेल्वम गटाचे निवडणूक आयोगाला साकडे
नवी दिल्ली – तामीळनाडूतील सत्तारूढ अण्णाद्रमुक पक्षाचे कार्यालय वापरण्यास शशिकला गटाला मनाई करावी, अशी मागणी करत पन्नीरसेल्वम गटाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या या दोन विरोधी गटांमधील संघर्ष आणखीच चिघळल्याचे मानले जात आहे.
अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला यांच्या झालेल्या नियुक्तीला विरोध दर्शवत पन्नीरसेल्वम गटाने आज नव्याने काही कागदपत्रे आयोगाकडे सादर केली. अण्णाद्रमुकचा ताबा कुणाकडे याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत पक्षाच्या मुखपत्राचे नियंत्रणही शशिकला गटाकडे असू नये, अशी भूमिका आयोगापुढे मांडण्यात आली आहे. तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली. सध्या तुरूंगात असणाऱ्या पक्षाच्या नव्या सरचिटणीस शशिकला यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंडाचे निशाण फडकावले. शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील गटांमधील संघर्ष याआधीच निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला. त्यानंतर आयोगाने मार्चमध्ये अण्णाद्रमुकचे निवडणूक चिन्ह (दोन पानं) गोठवले. आता दोन्ही गटांमध्ये संघर्षाचा पुढील अंक सुरू झाल्याचे चित्र आहे. या गटांचे एकत्रीकरण घडवून आणण्याचे प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाले. मात्र, दोन्ही गट एकत्र येण्याची शक्‍यता संपुष्टात आल्याचे ताज्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)