अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला- उद्धव ठाकरे

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण आंदोलन सुरु केले होते. मात्र अण्णांच्या आंदोलनाचा जोर यावेळेला फारसा काही दिसून आला नाही म्हणत शिवसेनेनंं सामनातून टीका केली आहे.

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते. नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंह रामलीला मैदानावर जातील ही अपेक्षा नव्हती, पण केंद्रातील एखादा कॅबिनेट मंत्री जाईल व उपोषण सुटेल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. अण्णांनी पुढची तारीख देऊन उपोषण सोडले आहे. भ्रष्टाचारी तसाच आहे व शेतकऱ्यांची मरणे वाढत आहेत. अण्णांचे उपोषण सुटले व ते सुखरूप गावी परतले यातच आम्हालाही तत्त्वतः आनंद आहे.

नेमक काय आहे ‘सामना’च्या अग्रलेखात…

मुळात अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व दिल्लीत जाऊन  त्यांनी मिळवले काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. शेतकऱ्यांच्या व लोकपाल वगैरे इतर प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. उपोषण बेमुदत स्वरूपाचे होते व ते फडणवीस यांच्या मध्यस्थीने सातव्या दिवशी सोडले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीस यश आले असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे नक्की काय झाले? विविध मागण्यांची पूर्तता करणारे पंतप्रधानांच्या सहीचे एक पत्र श्री. फडणवीस यांनी अण्णांना दिले व अण्णांच्या आंदोलनाची सांगता झाली. सरकारने सगळे प्रश्न तत्त्वतः मान्य केले. तत्त्वतः म्हणजे काय? हा पुन्हा प्रश्न आहेच. सहा महिन्यांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसेन, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

रामलीला मैदानावरील उपोषणाचे फलित काय? फक्त अण्णांचे वजन सहा-सात किलोने घटले. या आंदोलनात काहीच हाती लागले नाही. मग मागच्या आंदोलनात तरी काय हाती लागले होते याचा खुलासा कुणी करील काय? देशात लोकपाल व राज्याराज्यांत लोकायुक्त नेमावेत ही मागणी कालही होती, आजही आहे व सहा महिन्यांनीही राहणार आहे. कालच्या आंदोलनात जे ‘‘अण्णा झिंदाबाद’’च्या घोषणा देत होते व ‘‘लोकपाल हवाच’’ असे सांगत होते ते सर्व लोक दिल्लीत तसेच राज्याराज्यांत सत्तेवर आहेत. अण्णांचे मागचे आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनासाठी होते. काँग्रेसची राजवट भ्रष्ट व अनीतीची आहे असे तेव्हा अण्णा म्हणत होते. मग आताच्या राजवटी राजा हरिश्चंद्राच्या वंशजांच्या आहेत काय? ‘‘मैं अण्णा हूं’’ अशा गांधी टोप्या घालणारे तेव्हाचे लोक यावेळी अण्णांच्या आसपास फिरकायलाही तयार नव्हते. त्या अर्थाने अण्णांची अवस्था लालकृष्ण आडवाणींसारखीच झाली.

फक्त फरक असा की, आडवाणी मूक झाले आहेत व अण्णा बोलत आहेत. बोलून उपयोग नाही असा समज आडवाणींनी करून घेतला आहे व बोलत राहिल्याने, उपाशी राहिल्याने सरकार ऐकेल या भ्रमात अण्णा आहेत. या भ्रमाचा भोपळा रामलीला मैदानावर फुटला. ‘‘लोकपाल हवाच’’ असे जे सांगत होते त्यांना सत्तेवर येताच लोकपाल नको आहे व खुद्द गुजरातमध्ये लोकायुक्ताची जागा रिकामी आहे. महाराष्ट्राचे लोकायुक्त हे ‘मि. इंडिया’प्रमाणे अदृश्य आहेत व निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या गाडी-घोडा, बंगल्याची सोय इतकेच त्या पदाचे महत्त्व उरल्याने भ्रष्टाचाराचे उंदीर मंत्रालय कुरतडत आहेत. हे सर्वच पातळ्यांवर सुरू आहे.

अण्णांनी सात दिवस उपोषण केले, पण लोकांचा प्रतिसाद नव्हता. गर्दी हटली आहे अशी  टीका प्रसारमाध्यमे करीत होती. मागच्या वेळेस गर्दी होती व प्रसारमाध्यमांनी वातावरणात धग निर्माण केली होती. आता प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या बाबतीत अंगचोरपणा केला. मोदी व त्यांच्या सरकारचे भय त्यांना वाटत असावे. प्रसारमाध्यमे सरकारी मालकीची नसली तरी माध्यमांचे मालक सरकारी आश्रित झाल्याचा हा परिणाम आहे. अण्णांचे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही हा सगळ्यांचाच अजेंडा होता. त्यामुळे दिल्लीतही मोठे मंत्री व राजकारणी अण्णांच्या भेटीस गेले नाहीत. सातव्या-आठव्या दिवशी अण्णांच्या घशाला जास्तच कोरड पडली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच मध्यस्थीने उपोषण सुटायचे होते व त्यांच्या तत्त्वतः आश्वासनांवर भरवसा ठेवायचा होता तर मग रामलीला मैदानापेक्षा राळेगणसिद्धीत आंदोलन करायला हरकत नव्हती. ‘अखेर अण्णांचे उपोषण मागे’ या बातम्यांचे मथळे झळकायचेच होते, पण ते इतक्या गलितगात्र पद्धतीने झळकतील असे वाटत नव्हते. त्यामुळे अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते.

नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंह रामलीला मैदानावर जातील ही अपेक्षा नव्हती, पण केंद्रातील एखादा कॅबिनेट मंत्री जाईल व उपोषण सुटेल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. अण्णांनी पुढची तारीख देऊन उपोषण सोडले आहे. भ्रष्टाचारी तसाच आहे व शेतकऱ्यांची मरणे वाढत आहेत. अण्णांचे उपोषण सुटले व ते सुखरूप गावी परतले यातच आम्हालाही तत्त्वतः आनंद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)