चार दुचाकी जप्त


दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने करत होता चोरी

पुणे – दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने आणखी दुचाकी चोरल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.
राहुल राम सरवदे (वय 19, रा. पठारे वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले यांचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे तपास पथक नेमण्यात आले होते.
या मोहिमेत पोलीस नाईक संजय आढारी आणि पोलीस कॉन्स्टेबल हरूण पठाण साध्या वेषात फिरत होते. त्यावेळी लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पवार वस्ती येथे संशयितरित्या एक तरूण पल्सर दुचाकीवरून जात असताना त्यांना दिसले. पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावेळी ती पल्सर चोरीची आहे. याबरोबरच आणखी तीन दुचाकी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 379 (चोरी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले, पोलीस हवलदार विजय सावंत, मोहन काळे, अशोक आटोळे, पोलीस कर्मचारी संजय आढारी, हरूण पठाण, राहुल मोरे, विनोद महाजन, सचिन भिंगारदेवे, प्रशांत कापुरे, मारूती वाघमारे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)