अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली – मुत्सदी. चाणाक्ष, वक्‍ते आणि कवी, देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर “ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस’मध्ये 11 जूनपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. तेंव्हापासून वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी “एम्स’मध्ये केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेत्यांनी रीघ लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी “एम्स”कडे धाव घेतल्यापासूनच वाजपेयी यांच्याबद्दल एकप्रकारची हूरहूर लागून राहिली होती. “एम्स’च्यावतीने वेळोवेळी सकाळपासून वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय बातमीपत्र प्रसिद्ध करून सांगण्यात येत होते.

वाजपेयी यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यतेच्या पार्श्‍वभुमीवर “एम्स’मध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात कारण्यात आला होता. दुपारी 5 वाजून 05 मिनिटांनी “एम्स’च्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये वाजपेयी यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अस्त झाला आहे.

-Ads-

वयोज्येष्ठतेमुळे निर्माण झालेल्या विविध व्याधींवरील उपचारांसाठी वाजपेयी यांना 11 जून रोजीच “एम्स’मध्ये दाखल केले गेले होते. मधुमेह, छातीत पाणी साचणे आणि मुत्रपिंडाच्या संसर्गाने ते ग्रस्त होते. त्यातच त्यांना स्मृतिभ्रंशही (डिमेन्शिया) झाला होता. 2009 पासून त्यांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग पूर्णपणे थांबला होता आणि ते कायम व्हिलचेअरवरच असत. “एम्स’मध्ये दाखल केल्यापासून गेल्या 9 आठवड्यांमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र गेल्या 36 तासांमध्ये त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

डॉक्‍टरांनी अथक प्रयत्न केल्यानंतरही वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यांचे निधन झाले, असे “एम्स’च्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीमध्ये वाजपेयी यांच्या निधनामुळे दुःख व्यक्‍त करणारा ठराव करण्यात आला आहे. वाजपेयी यांचे पार्थिव कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)