- एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पिरंगुट – देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे. कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी. भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून विद्यार्थ्यांनी असा फार्म रोबोट तयार करावा. असे आवाहन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सावंत बोलत होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ऍड. संदीप कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए.एम.जाधव, पी.ई. कुलकर्णी, किरण देशपांडे, अनंतराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य सुनील लाडके, एच.आर. घोलप, पूजा जोग, तात्या देवकर, माजी सरपंच भीमाजी गोळे, सरपंच सुप्रिया धोत्रे, उपसरपंच संतोष दगडे, माजी सरपंच दिलिप गोळे, सुरेखा पवळे, ललिता पवळे, जनाबाई गोळे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, रामदास पवळे आदी उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नवनिर्मिती आणि नवतंत्रज्ञानाला पर्याय नाही. संस्थेच्या माध्यमातून काळानुरुप शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा. केंद्र शासनाने नीती आयोगाच्या माध्यमातून अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशातील अटल टिंकरिंग लॅब सुरु केल्या आहेत. कुतुहलातून संकल्पना, कल्पनेतून निर्मिती आणि निर्मितीतून संशोधन या चतुःसूत्रीवर आधारित अटल टिंकरिंग लॅबची उभारणी माध्यमिक शाळांमधून करण्यात येत आहे. या उपक्रमातूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने पिरंगुट, कामशेत, सुपे, आकुर्डी आणि वाघोली आदी शाळांमधून ही प्रयोगशाळा सुरू केली आहे. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी 20 लाख रुपये अनुदान मंजूर झालेले असून सध्या प्रत्येकी बारा लाख रुपये मिळालेले आहेत. इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे चाळीस विद्यार्थी या प्रयोगशाळेत काम करणार आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक साहित्य, संगणक, रोबोटिक तंत्रज्ञान, थ्रीडी प्रिंटर्स आदी साहित्य या प्रयोगशाळेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एच.आर. घोलप यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य सुनील लाडके यांनी केले. प्रा. अतुल चिखले यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा