अटलबिहारी वाजपेयींचे पुण्याशी आगळेवेगळे नाते

विविध संस्था आणि व्यक्ती यांच्याशी होते घनिष्ठ संबंध

पुणे – राजकारणाच्या सुरुवातीपासूनच आणि पंतप्रधान झाल्यानंतरही अटलबिहारी वाजपेयी यांचे पुण्याच्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशीही एक आगळेवेगळे नाते होते. विविध संस्था आणि व्यक्ती यांच्याशी त्यांचे घनिष्ठ असे संबंध होते, त्यामुळेच त्यांच्या निधनाने पुणेकरांना धक्का बसला आहे.

-Ads-

जनता पक्षाच्या प्रचारासाठी स. प. महाविद्यालय येथे झालेली जाहीर सभा आणि गदिमा रचित गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात कवीमनाच्या अटलजींचे झालेले ओघवते भाषण पुणेकरांच्या अजूनही स्मरणात आहे. अटलजी भाजप नेते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही काम पाहात होते. यानिमित्ताने पुण्यातील अनेक संस्था आणि व्यक्तींशी त्यांचा संबंध आला. त्यामध्ये बाबुराव किवळकर, सराफ हरिभाऊ नगरकर, संघाचे आबा अभ्यंकर, श्रीधरपंत फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आरती हरिप, जनता राजवटीतील त्यांचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारीया अशा अनेक लोकांशी त्यांचा संपर्क होता. अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी अनेक कॉंग्रेसजनही उपस्थित राहत होते. गोवा मुक्ती आंदोलनात पुण्यातील अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक अटलजींच्या संपर्कात होते. पक्षभेद विसरुन कार्यकर्ते आणि नेते त्यांच्याशी जवळीक साधत होते. त्यामुळे सर्वांच्याच मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त अशी भावना होती.

राजकीय सभासांठी गाजलेले स. प. महाविद्यालयाचे विस्तीर्ण मैदान आणि फर्गसन महाविद्यालयाचे मैदान अशा ठिकाणी झालेल्या सभा त्यांच्या भाषणाने चांगल्याच गाजल्या. पुण्यातील सर्वच सभांना कार्यकर्त्यांची आणि वक्‍त्यांची अलोट गर्दी असायची. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी वाजपेयी यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेने कलमाडी यांच्या प्रचाराची सांगता झाली होती.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 1984 साली पुण्यात झाली होती. त्यावेळी टिळक स्मारक मंदिरात त्यांचे भाषण झाले होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उद्‌घाटन, शिरुर तालुक्‍यातील दुष्काळी भागाला भेट या त्यांच्या कार्यक्रमामुळे त्यांचे पुण्याशी घनिष्ट संबंध निर्माण झाले होते. 1993 साली पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून पत्रकार संघाला पाच हजार रुपये देणगी दिली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)