विशेष संपादकीय

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान आणि कवीमनाचे राजकारणी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला आहे. द्रमुकचे नेते करुणानिधी कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांच्या निधनानंतर भारतीय राजकारणाला बसलेला हा तिसरा धक्का निश्‍चितच मन हेलावून टाकणारा आहे. अटलजींची प्रकृती चिंताजनक झाल्यावर देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व जातीधर्माच्या लोकांनी केलेली प्रार्थनाच या महान नेत्याची थोरवी स्पष्ट करते. पक्षभेद बाजूला ठेऊन सर्वांनीच या नेत्याची महानता मान्य केली आहे. गेली 9 वर्षे जरी अटलजी एकही शब्द बोलू शकले नसले तरी अमोघ वक्तृत्त्वाची देणगी लाभलेल्या या नेत्याची सोशल मिडीयावर व्हायरल झालेली भाषणे आजही अंगावर रोमांच उभे करतात. सभ्य माणूस, मुत्सद्दी राजकारणी आणि संवेदनशील कवी ही तीनही वैशिष्टये कोणत्याही नेत्यामध्ये शोधूनही सापडणार नाहीत. अटलजींनी मात्र ही तीनही वैशिष्ट्ये आयुष्यभर लीलया पेलली आणि इतरांना आदर्शही घालून दिला. 70 वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणाचा अनुभव असलेल्या अटलजींची कारकीर्द केवळ मार्गदर्शक अशीच होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने राजकारणाशी यांचा पहिला संबंध आला होता. तेव्हापासून शेवटपर्यंत त्यांनी प्रामाणिक राजकारणच केले. जनसंघ असो किंवा जनता पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली छाप पाडली होती. विरोधी बाकावर दीर्घकाळ राजकारण करणाऱ्या अटलजींच्या वक्तृत्वाचे कौतुक पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनीही केले होते. 1971 मध्ये बांगलादेश युध्दानंतर त्यांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिराजींचे मनापासून कौतुक करणारे भाषण केले होते. पण 1975 मध्ये त्याच इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. तेव्हा पहिला विरोधही अटलजींनीच केला होता आणि कारावासही भोगला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीला बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. तेव्हा अटलजी नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांनी आपली ही कारकीर्दही गाजवली होती. या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी चीन भेटीवर गेले. 1962 च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. 1971 च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. तो पुन्हा सुरु व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

वाजपेयी यांनी निःशस्त्रीकरण परिषदेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते आणि भारताच्या अणूू-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. जनता सरकार पडल्यानंतर अटलजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यातील मित्र खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले आणि देशात कॉंग्रेसला प्रबळ विरोधक निर्माण केला. त्या काळात ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकाकडून झालेल्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ 2 जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यामुळेच देशातील पहिला कॉंग्रेसेतर पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. जरी त्यांचे पहिले सरकार 13 दिवसच टिकले तरीही त्यांनी त्यावेळी आपल्या भाषणात देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. नंतरच्या काळात अटलजींनी आपले हे आवाहन प्रत्यक्षात आणून आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली आणि टिकवली. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. जरी आता भाचपचे मित्र कमी झाले असले तरी या प्रयोगाचा पाया अटलजींनी घातला होता हे मुळीच विसरुन चालणार नाही.

आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक निर्णय घेतले. वाजपेयी सरकारने जमिनीखाली केलेल्या अणुचाचण्या हा या निर्णयामधील हायलाईट होता. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रात निर्बंध लादले. तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे याची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या चाचण्या लाभदायीच ठरल्या. एवढेच नाही तर अटलजींनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. कारगिल युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघालाही त्यांनी “खेल भी जीतो और दिल भी” हा संदेश दिला होता.

खरेतर कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणारी आहे. दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असतांना पाकिस्तान काश्‍मीरमध्ये घुसखोरी करत होता. म्हणूनच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू झाले. पाकिस्तानने त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. चीनला भेट देउन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मदतीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्‍मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला. आज भारताचे परराष्ट्र धोरण कमालीचे विस्कळीत असताना अटलजींच्या कणखर धोरणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण दुर्देवाने तो आनंद अटलजींना आजारपणामुळे मनापासून अनुभवता आला नाही. आता देश वर्षभरात पुन्हा निवडणुकीला सामोरा जात असताना अटलजींची पोकळी भाजपला जाणवणार आहे. सध्यातरी त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचे काम मोदी, अमित शहा यांना करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)