अटलजी वैश्विक नेते – राज्यपाल सी. विद्यासागर राव

नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे लोकशाहीचे आदर्श होते. ते केवळ भारतीय नव्हे तर वैश्विक नेते होते अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.

आज सकाळी 6-ए, कृष्ण मेनन मार्ग या त्यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना राज्यपाल म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्याचा शासकीय आदेश तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काढण्यात आला. नंतर संशोधित वन कायदाच तयार करण्यात आला. याचा पाया श्री. वाजपेयी यांनीच रचला असल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रात आदिवासी कोषातून 5 टक्के रक्कम आदिवासी कल्याणासाठी देण्याची अधिसूचना राज्यात काढण्यात आली. आदिवासींचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले काम सदैव डोळ्यापुढे राहत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

श्री. वाजपेयी यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्य जपण्याचे काम केले. मूल्याधारित राजकारण श्री. वाजपेयी यांनी केले. श्री. वाजपेयी यांच्यासोबत 1972 पासून झालेल्या कौटुंबिक आणि सार्वजनिक भेटींना उजाळा देत राज्यपालांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)