अजून किती बळीनंतर एसटीला जाग येणार !!

मुजोर बसचालकांना शिस्त लावण्याची मागणी

अमित शिंदे

कराड –
एखादा अपघात झाला की या विषयावर मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशाच अर्विभावात वागायचे, ही जणू मानसिकताच बनली असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. असे प्रकार थांबले पाहिजेत. पाटण तालुक्‍यातील गुढे येथे मंगळवारी शाळकरी मुलगी एसटीच्या चाकाखाली चिरडल्याची घटना घडल्याने सर्वसामान्य जनतेतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. अशाप्रकारचे किती बळी गेल्यानंतर एस. टी. प्रशासनाला जाग येणार? मुजोर बेदरकार एसटी चालकांना कोण शिस्त लावणार? असे एक ना अनेक प्रश्‍नांनी पुन्हा एखदा डोके वर काढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी गुढे, ता. पाटण येथे शाळकरी मुलीचा एसटीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झालेच्या हृदयद्रावक घटनेने प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. एसटी चालकाच्या बेजबाबदार वागण्यामुळे अशा आणखी किती निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागणार असा संतप्त प्रश्‍न निर्माण झाला आहे. बस थांब्यावर गाडी थांबविल्यानंतर सर्व प्रवासी चढले, उतरलेत का, तसेच ते वाहनापासून लांब आहेत का, हे बघण्याची जबाबदारी संबंधित चालकाची असते. पण कोणीही या गोष्टींकडे गांभिर्याने पाहत नाहीत. काळजी न घेताच गाडी पुढे रेटण्याचे प्रकार अजून चालक करीत असतात. त्यांच्या अशा बेजबाबदार पणामुळे निष्पाप जीव जात आहेत. याबाबत एसटी प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याने जनतेमधून एसटी प्रशासनाच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

वास्तविक, एसटी हा ग्रामीण जिवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु हेच एसटी चालक स्वतः मालक असल्याप्रमाणे प्रवाशांबरोबर मुजोरपणे वागतात, अरेरावीची भाषा वापरतात, त्या चालकांच्या गाडी चालवण्याबद्दल तर काही बोलायलाच नको आपण वडापच्या चालकाला शिव्याशाप देतो आणि त्याला गाडी कशी चालवली पाहिजे, याचे ज्ञान देत असतो. पण हे एसटी चालक खरच प्रशिक्षित आहेत का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. गियर बदलताना क्‍लचचा वापर करा, हा फलक चालकाच्या केबिनमध्ये दिसतो खरा पण तो नियम चालक कितपत पाळतो, हा संशोधनाचा विषय बनला आहे. रस्ता कच्चा असो की चांगला भरधाव वेगाने गाडी चालवणे मग बसमधील प्रवाशांचे काय हाल होत असेल, आपण माणसांची वाहतूक करतोय की जनावरांची याच सुद्धा भान त्यांना राहत नाही.

स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी प्रशासन ऊर बडवून घेतंय आणि हे चालक स्वतःच्या बस केबिन मध्येच जिथं आपल्याला दिवसाचे काही तास घालवायचे असतात तिथेच ध्रुमपान करुन घाण करण्याचा प्रकार करत असतात. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना शिस्त, स्वच्छता व सुरक्षिततेचे धडे देण्यापेक्षा चालक वाहकांना एसटीच्या नियमाला अधिन राहून प्रामाणिक सेवा करण्याचे आदेश द्यावेत. मात्र प्रशासनाकडून नेमकी हीच कारवाई होत नसल्याने या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यातून अनेक निष्पाप जिवांचा बळी जात आहे. याकडे एसटी प्रशासनाचे वरिष्ठांनी गांभिर्याने लक्ष देवून चालकांना तशा सक्त सूचना कराव्यात, तरच एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास होईल. अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या…अशीच गत होईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)