अजून किती दिवस मार्च अखेरीचे काम सुरू राहणार ?

जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 3 – मागील चार महिन्यात एकही पैसा खर्च न करता लाखो रूपयांचे व्याज वाढवल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे, विशेषत: अर्थ विभागाचे अभिनंदन, असा उपरोधीक ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मांडत, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगेलच धारेवर धरले. “जिल्हा परिषदेचा निधी हा जनतेच्या विकासासाठी आहे’, व्याजाचा धंदा करण्यासाठी नाही. अजून किती दिवस मार्च अखेरीचे काम सुरू राहणार, अद्याप एकही फाईल अर्थविभागातून पुढे गेली नाही, अशा सडेतोड शब्दात सदस्य रणजित शिवतारे, गटनेते शरद बुट्टेपाटील, आशा बुचके यांच्यासह अन्य सदस्यांनी अधिकाऱ्यांची “खरडपट्टी’ काढली.

-Ads-

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सूजर मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील यांच्यासह सभापती, गटनेते, समितीचे सदस्य आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. प्रशासनामध्ये निधी खर्च करायचा असतो, ही मानसिकताच नसल्याचे दिसून येते. आर्थिक वर्ष संपून 4 महिने झाले तरी, अद्याप एकाही कामाला सुरूवात नाही. 2018-19 मधील अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदीनुसार असलेल्या कामांबाबत एखाद्या अधिकाऱ्याला विचारले असता, फाईल अर्थ विभागाकाडे आहे, निधी मंजूर झाला नाही असे सांगितले जाते. त्यामुळे अर्थ विभागाचे अधिकारी (कॅपो) मंजूरी का देत नाही, असा प्रश्‍न उपस्थितीत करत, अर्थविभागाच्या आडमुठेपणामुळेच विकासकामांना “खो’ बसत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

यावेळी रणजीत शिवतारे यांनी अर्थ विभागाने एकही पैसा खर्च न करता, लाखो रूपयांचे व्याज वाढवले त्यामुळे अभिनंदन करतो, असा उपरोधीत अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडला. परंतू, हा उपरोधीत टोलाही अधिकाऱ्यांना क्षणभर समजला नाही. अखेर शरद बुट्टेपाटील, आशा बुचके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत हा पैसा जनतेच्या विकासासाठी आहे, व्याज मिळवण्यासाठी नाही. प्रत्येकवेळी अर्थविभागाकडून अडवणूक होत असेल किंवा निधी खर्च करण्याची मानसिकता नसेल तर, सदस्यांना ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाची उदाहरणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडला. त्यावेळी सूरज मांढरे यांनीही अधिकाऱ्यांना खडसावत कोणतेही विषय लपवून ठेवू नका, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

————————————
स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सोडले तर सर्वच समित्यांचे सभापती उशिरा आले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी सभापतींचा चांगलाच समाचार घेतला. “तुम्हाला खुर्चीचा, पदाचा सन्मान राखता येत नसेल तर राजीनामे द्या’, अशा शब्दात गटनेत्या आशा बुचके यांनी सभापतींना सुनावले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा दुपारी 2 वाजता सुरू होते. त्यानुसार शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अधिकारी आणि सदस्य वेळेवर उपस्थित होते. मात्र, सर्व समित्यांचे सभापतीचा ठावठिकाणा नव्हता. तब्बल अर्धा ते पावून तास उशिराने सभापती आल्यामुळे उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आशा बूचके यांनी सभापतींना सुनावले. तुम्हाला सभापतीपदाचे महत्व वाटत नसेल तर राजीनामे द्या. तुम्हाला राजीनामा देता येत नसेल तर आम्ही तुम्हाला राजीनामा द्यायला भाग पाडू, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)