अजित पवार यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा

पुणे – जिल्हा परिषदेच्या कामाकाजाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. त्यावेळी यंदा राबविण्यात येत असलेल्या डीबीटी योजनेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल आणि राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, त्यासाठी योग्य प्रस्ताव देण्यात यावे, अशा सूचना पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा परिषद कार्यालयाला गुरूवारी (16) अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी आणि पशुसंवर्धनच्या सभापती सुजाता पवार, महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे तसेच अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी विभागवार माहिती घेतली. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभ योजनेची माहिती घेत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची कमी असणारी संख्या तसेच निधीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी या विषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या सेवा हक्क कायद्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी अजित पवार यांना विभागवार माहिती दिली.

तसेच जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाचा कामाचा व्याप मोठा आहे. मात्र, या विभागातील अभियंत्यांची संख्या अपुरी असल्यामुळे कामाची गती कमी होत होत असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे कंत्राटी तत्वावर शाखा अभियंता भरण्यासाठी शासनाकडे जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठविला आहे, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची भाड्यापोटी असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असलेली थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाकडे असलेली 36 कोटीची थकबाकीबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे अनेक समस्या मांडल्या. त्यावेळी काही समस्यांमध्ये पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये थेट संबधितांना संपर्क साधत माहिती घेतली आणि सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)