अजित पवारांना “दिल्ली’चे वेध?

-शिरूर लोकसभेसाठी ठोकले “शड्डू’; मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण
-बारामती विधासभेसाठी कोण? तिकीट पवार घराण्यातीलच व्यक्‍ती की निष्ठावंतानांना मिळणार संधी?

रोहन मुजूमदार

पुणे – पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीआधीच चांगलाच चर्चेत आला असून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “शड्डू’ ठोकल्याने आगामी निवडणुकीआधीच आव्हान प्रतिआव्हानांची “कुस्ती’ या मतदारसंघात सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवारांना “दिल्ली’ (खासदारकी)चे वेध लागल्याने बारामती विधानसभेसाठी कोण? हा प्रश्‍न समोर आला आहे. मात्र, अजित पवारांच्या खासदारकीवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. मात्र, तोपर्यंत शिरूर लोकसभा व बारामती विधानसभेत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे राष्ट्रवादीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे. सध्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे तर आमदार म्हणून अजित पवार कार्यभार सांभाळत आहे. त्यामुळे शरद पवार या लोकसभा आणि विधासभेसाठी निर्धास्त आहेत. याआधी अजित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याची चर्चा मध्यतरी चांगलीच रंगली होती. तर सोशल मीडियावर ही चर्चा गाजली पण तशी शक्‍यता नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आल्याने या चर्चेला पूर्णविराम लागला. मात्र, आता त्यांनी स्वत:हूनच शिरूर लोकसभेसाठी “शड्डू’ ठोकले असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून कर्जतप्रमाणे हाही “फेक’ बॉम्ब ठरणार याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीतील दिग्गज पडले कमी?

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून तिकिट मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे. त्यातच या विधानसभेत राष्ट्रवादीचे गट-तटाचे राजकारण आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा विधानसभेवर खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील यांचे गेल्या तीन टर्मपासून वर्चस्व असून त्यांच्याविरोधात लढायला एकाही पक्षाला उमेदवार मिळत नाही हे वास्तविक कोणीही नाकारणार नाही. तर यंदा आढळराव यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीने “विडा’ उचलला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीतील “दिग्गजांना’ खासदारीची “गळ’ घातली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांची खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात न लढण्याची मानसिकता झाली. म्हणूनच की काय अजित पवारांनीच “शड्डू’ ठोकला. लोकसभेसाठी कार्यकर्ता घडविण्यात राष्ट्रवादीतील दिग्गजांना अपयश येणे ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

पार्थ पवारसाठी “सेफ’ गेम?

अजित पवार यांनी शिरूर लोकसभेसाठी “शड्डू’ ठोकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून कोण उभे राहणार, यावर राजकीय गोटात “खलबते’ सुरू झाली आहेत. जर अजित पवारांची खासदारकी “फिक्‍स’ झाली तर बारामती विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पवार कुटुंबातील एखाद्या व्यक्‍तीस की बारामतीतील राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांस तिकिट मिळणार, हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान, मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार इच्छुक असल्याची सध्या चर्चा असून त्यादृष्टीने चाचपणीही सुरू आहे. या चाचपणीत काही “अघटीत’ उत्तर राष्ट्रवादीला सापडले का? म्हणून अजित पवारांनी बारामती विधानसभा “पार्थ’साठी “सेफ’ राहिल असे ठरवून स्वत: शिरूर लोकसभेसाठी “शड्डू’ ठोकला आहे? असा प्रश्‍न सध्या राजकीय विश्‍लेषकांना पडला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)