अजित पवारांचे सुपुत्र लढवणार लोकसभा निवडणूक?

मावळात “राजकीय बॉम्ब’ : भाऊ, आप्पांच्या गोटात खळबळ

पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

-Ads-

राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 6 आणि 7 सप्टेंबरला लोकसभा मतदार संघ निहाय बैठकीत शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यापूर्वीच पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या केवळ चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ व शिरूर मतदार संघातून शिवसेनेला यश मिळाले, तर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. अगदी पावणे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता भाजपने हिरावून घेतली. मात्र, हे काम राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सक्रीय सहभागामुळेच झाल्याने अजित पवार कमालीचे नाराज झाले. राष्ट्रवादीची पडझड रोखण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी दोन-चार महिन्यांतून ते एकदा शहराचा दौरा करतात.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा वानवा असल्याने संजय नार्वेकर यांना आयात करावे लागले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले. बारणे यांना 5 लाख 12 हजार, 233 मते मिळाली. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शेकापचे लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार, 829 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे संजय नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार, 923 मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते.

मावळ लोकसभा मतदार संघाची राजकीय स्थिती पाहता बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे अजित पवार या मतदार संघातून आपल्या मुलाला उमेदवारी देतील, याबद्दल राजकीय विश्‍लेषकांमध्ये मतभेद आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी देखील शिरूर आणि माढा लोकसभा मतदार संघांची चाचपणी केली होती. मात्र, बारामतीएवढा सुरक्षित मतदार संघ न मिळाल्याने त्यांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले. पवारांच्या या राजकीय खेळी बरेच काही सांगून जातात. पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, तरी देखील अजित पावर यांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. 6 आणि 7 सप्टेंबरला लोकसभा निहाय बैठकीत मावळच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब होईल, असा अंदाज आहे.

एकाच दगडात दोन पक्षी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गद्दारीमुळे राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेल्याची खंत अजित पवार यांना आहे. तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.लोकसभेचा विचार करता भाजपकडून जगताप, तर शिवसेनेकडून पुन्हा बारणे हे पारंपरिक राजकीय शत्रू एकमेकांना भिडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पार्थ यांच्या उमेदवारीने दोन पक्षी एकाच दगडात मारण्याचा राष्ट्रवादीचा विचार तर नाही ना? अशी चर्चा आहे.

What is your reaction?
230 :thumbsup:
281 :heart:
2 :joy:
5 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)