“अजिंक्‍य-अजित’ (अग्रलेख)

उणीपुरी सात-साडेसात वर्षांची आणि 37 कसोटी सामन्यांची कारकीर्द, त्यातही जेमतेम दोन हजार धावा आणि अवघे एक शतक… आज झटपट क्रिकेटमध्येही शतकामागून शतके आणि चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्याचे व्यसन लागलेल्या पिढीसाठी ही आकडेवारी असलेला क्रिकेटपटू खिजगणतीतही बसला नसता; परंतु इतक्‍या अल्प कारकिर्दीत आणि विक्रमांच्या पुस्तकात कोठेही न दिसणारी आकडेवारी नावावर असतानाही इतिहासात अजरामर होण्याची किमया फार थोड्यांना साधते.

अजित वाडेकर यांनी हे सारे साधलेच, शिवाय योग्य वेळी क्रिकेटमधून बाजूला होण्याचा (बहुतेकांना न जमणारा) निर्णय सहजपणे घेतल्यावर त्यांनी पुढच्या काळात एक उत्कृष्ट प्रशासक, मार्गदर्शक आणि संघटक असा लौकिक मिळवितानाच एकापेक्षा एक दर्जेदार क्रिकेटपटूंना पाठिंबा देत त्यांची कारकीर्द घडविली. त्यामुळेच अजित वाडेकर यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरपासून अनिल कुंबळेपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी पोरके झाल्याची भावना व्यक्‍त केली.

देशाला एकामागून एक विक्रमी विजय मिळवून देणारे कर्णधार हे वाडेकर यांचे क्रिकेटच्या मैदानावरील कर्तृत्व, परंतु त्याहीपेक्षा वाडेकर यांचे स्थान वेगळ्याच कारणाने अढळ ठरले. अजित वाडेकर यांनी कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी केवळ मार खाणारा संघ अशी अपकीर्ती असलेला भारतीय संघ त्यांच्या नेतृत्वाखाली अचानक वाघ बनला आणि “मायदेशातच नव्हे तर परदेशातही विजय मिळविणारा संघ,’ असा लौकिक मिळविण्यात यशस्वी झाला. आत्मविश्‍वास लाभलेल्या भारतीय संघाची तेव्हा सुरू झालेली घोडदौड अद्याप थांबलेली नाही; आणि त्याचे श्रेय निर्विवादपणे अजित वाडेकर यांचेच आहे. इतकेच नव्हे तर, ते भारताचे पहिले एकदिवसीय कर्णधारही होते. त्याआधी इंग्लंडमध्ये सन 1932 मध्ये पहिलावहिला कसोटी सामना खेळणारा भारतीय क्रिकेट संघ त्यानंतर जवळजवळ तीन-साडेतीन दशके जागतिक क्रिकेटमध्ये लिंबूटिंबू होता. या कालावधीत भारतीय संघाने अनेक पराभव सोसले आणि विजयाची चव फारच क्‍वचित चाखली. संस्थानिक आणि राजे-महाराजांच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी भारतीय क्रिकेटला काही काळ लागला.

दरम्यान, अफाट नैसर्गिक गुणवत्ता असलेले काही क्रिकेटपटू भारताला लाभले; परंतु एक संघ म्हणून भारताची कामगिरी यथातथाच राहिली. मन्सूर अली खान पतौडी यांनी भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारल्यावर ही परिस्थिती काही प्रमाणात बदलली; परंतु मूळ समस्या कायमच होती. अशा वेळी सन 1970-71 मधील वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दौऱ्यात जाऊ शकणार नसल्याचे पतौडी यांनी जाहीर केल्यावर, निवड समिती अध्यक्ष विजय मर्चंट यांच्या “कास्टिंग व्होट’मुळे कर्णधार झालेल्या वाडेकर यांच्या रूपाने भारतीय संघाला पहिल्यांदाच मध्यमवर्गीय कुटुंबातील नेता लाभला; आणि त्यांनीही कर्तृत्वाला नशिबाची जोड देत नवा इतिहास घडविला.

अत्यंत बुद्धिमान आणि चाणाक्ष कर्णधार असलेल्या वाडेकर यांच्या “मिडास टच’ने जणू काही जादू केली आणि सलग तीन मालिका जिंकल्यानंतर तर वाडेकर यांच्या भारतीय संघाला अनधिकृतरीत्या जगज्जेतेपदाचा दर्जा देण्यात येऊ लागला. त्याआधी न्यूझीलंड दौऱ्यातही वाडेकर यांच्या शतकामुळेच भारताने परदेशी भूमीवरील पहिलावहिला मालिका विजय मिळविता आला होता, हे फार कमी जणांना माहीत असेल. डावखुरे फलंदाज जात्याच शैलीदार आणि आकर्षक असतात. वाडेकर त्याला अपवाद नव्हते. शिवाजी पार्क जिमखाना संघाकडून खेळताना त्यांनी शतक झळकावले नाही असा रविवार जात नसे, अशी आठवण खुद्द सुनील गावसकर यांनी सांगितली आहे.

शिवाजी पार्कचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दादर युनियनचे गावसकर हे खेळाडू. परंतु अजित वाडेकर यांच्या फलंदाजीचे चाहते असलेल्या गावसकर यांच्यासाठी हे शत्रुत्व कधीही आड येत नसे. मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेतही वाडेकर यांनी आपल्या शैलीदार फलंदाजीची छाप पाडली. परिणामी निर्णायक क्षणी विजय मर्चंट यांचे मत वाडेकर यांच्या पारड्यात पडले आणि पुढचा इतिहास घडला. योगायोगाने सुनील गावसकर यांनी वाडेकर यांच्याच नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण केले आणि विक्रमी कामगिरीने तो वेस्ट इंडीजचा दौराही गाजविला. गावसकर, गुंडाप्पा विश्‍वनाथ व दिलीप सरदेसाई यांच्या फलंदाजीबरोबरच बी. एस. चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंग बेदी आणि श्रीनिवास वेंकटराघवन या चौकडीच्या फिरकीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा प्रस्थापित केला, तो वाडेकर यांच्याच कारकिर्दीत. स्वत: उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षक असलेल्या वाडेकर यांच्या हाताखाली एकनाथ सोळकर, वेंकट, अबीद अली आणि गावसकर असे जागतिक कीर्तीचे क्षेत्ररक्षक तयार झाले.

वेस्ट इंडीज आणि इंग्लंडवर त्यांच्याच भूमीवर विजय मिळविणाऱ्या वाडेकर यांची 1974 मधील इंग्लंड दौऱ्यातील पराभवानंतर कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली व पाठोपाठ त्यांनी क्रिकेटमधून निवृत्तीही स्वीकारली. निवृत्तीनंतर स्टेट बॅंकेच्या कामाला वाहून घेणाऱ्या वाडेकर यांनी थेट 1990 मध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून पुनरागमन केले. भारतीय संघाचे कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक व निवड समिती अध्यक्ष अशी चारही पदे भूषविणारे ते केवळ तिसरे भारतीय होत. या भूमिकांमध्येही त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. भारतीय क्रिकेटला जगभरात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या वाडेकर यांनी आता कायमची “एक्‍झिट’ घेतली असली, तरी असंख्य क्रिकेटरसिकांच्या मनातील त्यांची “अजिंक्‍य अजित’ ही प्रतिमा पुसली जाणे अशक्‍यच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)