अजय देवगणला चीनमधील पुरस्कार

अजय देवगणला नुकताच चीनमधील “गोल्डन रोस्टर अॅन्ड हंड्रेड फ्लॉवर’ चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी कलाकार म्हणून गौरवण्यात आले. “रेड’ सिनेमातील भूमिकेसाठी अजयला या पुरस्काराने गौरवण्यात आले. “चायना फिल्म असोसिएशन’च्या वतीने दरवर्षी हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात वास्तववादी सिनेमाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यानुसार “रेड’च्या रोलसाठी अजयला या पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. 1980 च्या कालखंडात उत्तर भारतातील पार्श्‍वभूमी असलेल्या “रेड’मध्ये देशातील गाजलेल्या इन्कम टॅक्‍स “रेड’ची कथा मांडली गेली आहे. अर्थात कथा सत्यघटनांवर आधारित असल्याने त्याला वेगळी वास्तववादी फोडणी देण्याची गरजच नव्हती. त्यातही अजय देवगणचा अभिनय हा वास्तवाशी धरून असल्याने त्याला मिळालेला पुरस्कार योग्यच आहे.

अजय देवगण सध्या “तानाजी’ या होम प्रॉडक्‍शनच्या कामामध्ये बिझी आहे. स्वतः अजय नरवीर तानाजीचा रोल करणार आहे. हिंदी पडद्यावर कदाचित पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक शौर्यगाथा साकारली जाणार आहे. याशिवाय अजयच्या खिशामध्ये आणखी एक चांगला सिनेमा येण्याची शक्‍यता आहे. “बधाई हो’चा डायरेक्‍टर अमित शर्मा फुटबॉलवर आधारित एक सिनेमा करण्याची तयारी करतो आहे. 1951 ते 1962 या कालखंडातील भारतीय क्रीडाविश्‍वामध्ये फुटबॉलचा गवगवा होता. त्याच कालखंडातील भारतीय टीमचे कोच सय्यद अहमद रहिम यांच्यावर ही कथा आधारलेली असणार आहे. त्यावेळच्या टीममधील मुख्य खेळाडू फॉर्च्युनाटो फ्रॅन्को आणि तुलसीदास बलराम यांची अमित शर्माने नुकतीच भेट घेतली होती. ही टीम 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती आणि जकार्ताच्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलही मिळवले होते. यात अजय लीड रोल साकारण्याची शक्‍यता आहे.

आणखी एक महत्त्वाचे म्हणजे अजयने मराठीत काम करायची तयारी दर्शवली आहे. आपल्यासाठी चित्रपटाची स्क्रीप्ट महत्त्वाची आहे. मग हा सिनेमा हिंदी ऐवजी मराठी असला तरी चालेल, असे तो नुकतेच म्हणाला. अजयने यापूर्वी “विट्टी दांडू’ आणि “आपला माणूस’चे प्रॉडक्‍शन केले आहे. आता तर “तानाजी’च्या निमित्ताने मराठी भाषेचा आणि परंपरेचा त्याचा निकटचा संबंध आला आहे. कदाचित यानिमित्ताने तो मराठीत कामही करायला तयार होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)