अजय जयरामची आगेकूच, अभिषेक, मुग्धा पराभूत

तैपेई चीन बॅडमिंटन स्पर्धा

तैपेई: भारताचा गुणवान खेळाडू अजय जयरामने पहिल्याच फेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना येथे सुरू झालेल्या जागतिक स्पर्धा मालिकेतील तैपेई चीन वर्ल्ड टूर सुपर-300 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. मात्र मुग्धा आग्रे आणि अभिषेक येलिगर या भारतीय खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

दुखापतीतून कम बॅक करीत असलेल्या अजय जयरामने जपानच्या हाशिरू शिमोनोचा कडवा प्रतिकार 18-21, 21-17, 21-9 असा मोडून काढताना विजयी सलामी दिली. ही लढत 59 मिनिटे रंगली. विश्‍वक्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या जयरामसमोर दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या किम ब्रुनचे आव्हान आहे. किम ब्रुनने पहिल्या फेरीत सातव्या मानांकित लुकास कोरव्हीचा 21-19, 21-17 असा सनसनाटी पराभव केला. अजय जयरामने काही दिवसांपूर्वी व्हिएतनाम स्पर्धेत आणि व्हाईट नाईट्‌स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

पुरुष एकेरीतील आणखी एका सामन्यात भारताच्या अभिषेक येलिगरला पाचव्या मानांकित यान ओ जॉर्गज्ञन्सेनविरुद्ध 5-21, 6-21 असा केवळ 20 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. तसेच महिला एकेरीत अमेरिकेच्या सातव्या मानांकित सोनिया चीहने भारताच्या मुग्धा आग्रेचा 21-11, 21-4 असा केवळ 23 मिनिटांत धुव्वा उडविला.

माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्मासमोर पहिल्या फेरीत यजमान तैपेई चीनच्या ली चिया हाव याचे आव्हान आहे. डेन्मार्क ओपन स्पर्धा, तसेच फ्रेंच ओपन स्पर्धा अशा दोन सुपर-750 दर्जाच्या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी पी. व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी तैपेई चीन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)