अचूक हवामान अंदाजासाठी आणखी 50 रडार

हवामान विभागाचे प्रयत्न : यंत्रणा करणार सक्षम


विस्तारासाठी हवाईदल आणि नौदलासोबतही चर्चा

पुणे – गेल्या काही वर्षांत होणारे हवामान बदल, त्यामुळे उद्‌भवणारी आपत्ती आणि त्यातून होणारे नुकसान लक्षात घेत, भारतीय हवामानशास्त्र विभागाने हवामानाबाबत सूचना देणारी रडार यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांतर्गत विभागातर्फे देशभरात 50 नवीन डॉप्लर रडार बसविण्यात येणार आहेत. यामाध्यमातून नैसर्गिक आपत्तींची सूचना लवकरात लवकर मिळून त्याबाबच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, असा उद्देश असणार आहे.

हवामानशास्त्र विभागातर्फे पुण्यात आयोजित एका चर्चासत्रावेळी भूविज्ञान शास्त्र मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन आणि हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी ही माहिती दिली. रमेश म्हणाले, “गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे स्वरूप अधिक गंभीर होत आहेत. देशात अनेक ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्तीचा पाऊस, तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होत आहे. इतकेच नव्हे, तर पाऊस पडण्याचा कालावधीदेखील बदलला आहे. या सर्वांचा व्यापक परिणाम देशात होत आहे. अनेकदा जोरदार पाऊस, वादळ, भूकंप, त्सुनामी यांसारख्या घटनांची पूर्वसूचना उशिरा मिळाल्याने यंत्रणांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. अशा परिस्थितीत पूर्वसूचना देणारी “रडार’ यंत्रणा सक्षम केल्यास येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. तसेच या घटनांचा अधिक सविस्तरपणे अभ्यास करता येईल.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी दोन वर्षांत देशभरात 50 डॉप्लर रडार बसविण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये दहा नवीन ड्युअल-पोल रडार्स बसविण्यात येणार आहेत. रडार यंत्रणेच्या सक्षमीकरण आणि विस्तारासाठी हवाईदल आणि नौदलासोबतही चर्चा सुरू असून, नवीन 11 सी बॅन्ड रडारच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजीवन यांनी दिली. यापैकी एक रडार हे अंदमान, निकोबार बेट याठिकाणी बसविण्यात येणार आहे. या रडार नेटवर्कच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना लवकरात लवकर मिळून त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)