अचानक बेपत्ता झालेली मुलगी सापडते तेव्हा…!

पिंपरी – शिकवणीनंतर अकरा वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिला शोधण्यासाठी पालक व पोलिसांची एकच धावपळ उडाली. मात्र, ती लोणावळा येथे सापडल्याचे एका चिक्की व्यापाऱ्याने कळविल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, बेपत्ता होण्यामागचे कारण या मुलीने अद्याप सांगितले नसले तरी पाल्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.

रुध्वी महेश लाड (वय-11, रा. काळभोर) असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रुध्वीला ट्युशन संपल्यावर तिच्या नेहमीच्या रिक्षावाल्या काकांनी सायंकाळी सातच्या सुमारास तिच्या घरासमोर सोडले. मात्र रात्री आठ वाजले तरी ती घरी न परतल्याने पालकांची काळजी वाढली. नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या मदतीने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यावर पोलिसांनी त्वरीत तपास पथके रवाना केली. तपास सुरु असतानाच पालकांना लोणावळा येथून एका चिक्की व्यापाऱ्याचा फोन आला त्याने संबंधीत मुलगी लोणावळा येथे असल्याचे सांगितले. पोलीस तातडीने तेथे धाव घेत रुध्वीला त्यांनी ताब्यात घेतले.
आई-वडिलांनी ट्यूशनची फी भरण्यासाठी रुध्वीला पैसे दिले होते. ते पैसे तिने भरले नाहीत. ती संध्याकाळी घराजवळ उतरली खरी पण ती घरी न जाता चिंचवड रेल्वे स्थानकावर गेली. तेथून लोकलने लोणावळा येथे गेली.

तिथे चिक्कीच्या दुकानात जाऊन खरेदी केली. यावेळी तिच्या जवळ असलेले पैसे, शाळेचा गणवेश पाहून व्यापाऱ्याला शंका आली. त्याने तिला विश्‍वासात घेवून विचारणा केली तिने तिची माहिती देत घरचे फोन क्रमांक व्यापाऱ्याला दिले. त्यानुसार त्याने फोनव्दारे संपूर्ण प्रकार सांगितला व रुध्वी सुखरूप असल्याचे कळल्यानंतर पालक व पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र, असे पाऊल का उचलले हे रुध्वीने अद्याप सांगितले नाही.

या घटनेवरून पोलिसांनी पालकांना आपल्या पाल्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख व त्यांच्या तपास पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)