अग्नितांडव; झोपड्या जळून खाक

पहिले घर जळालेल्या सुरेखाची कहाणी 
पाटील इस्टेट झोपडपट्टीत पहिले घर रेखा लहु हुबळे यांचे जळाले. त्यांचे दोन मजली पत्र्याचे घर होते. त्या कामावर गेल्यावर त्यांच्या दोन मुली खालच्या मजल्यावर होत्या. त्यांच्या वरील मजल्यावर सर्वप्रथम आग लागली. काय झाले हे पाहण्यासाठी दोन्ही मुली तिकडे धावत गेल्या. मात्र, आग भडकल्याने त्या तशाच खाली धावत घराबाहेर पडल्या. यानंतर आगीने रौद्र रुप धारण करत एक एक झोपडी पेट घेत गेली. घरामधील कागदपत्रासह, कपडे, भांडी आणि जीवनावश्‍यक सर्व वस्तू जळून खाक झाल्याची आपबिती सुरेखा हुबळे यांनी कथन केली.

कागदपत्रे जळाल्याने भविष्याची चिंता
बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मी एमपीएससीची तयारी करत होतो. आई-वडील नसल्याने नातेवाईकांच्या घराशेजारीच एक खोली घेतली होती. यामध्ये सर्व शैक्षणिक कागदपत्रे ठेवली होती. तसेच अॅथलेटिक्‍समध्ये विभागीय पातळीवर खेळत असल्याने क्रीडा साहित्यही घरातच होते. आगीमध्ये सर्व साहित्य आणि कागदपत्रे भस्मसात झाली. यामुळे भविष्याची चिंता सतावत आहे, अशी काळीज हेलावणारी कहाणी विक्रम कांबळे यांनी सांगितली.

-Ads-

जिंदगी बच गई… बाकी सब गया
“मी शॉपर्स स्टॉपमध्ये सुरक्षा रक्षक आहे. जेवणाचा डबा घेण्यासाठी घरी आलो, तेव्हा शेजारी आग लागल्याचे समजले. तसाच धावत घरी पोहचलो. यानंतर प्रथम घरातील सिलेंडर आणि कागदपत्रे घेऊन बाहेर पडलो. यातील अनेकांनी अंगावरील कपड्यानिशी घरातून पळ काढला. जिंदगी बच गई, मगर बाकी सब गया… अशा भावना सुनील गिरी यांनी व्यक्‍त केल्या.

नेत्यांनी घेतली बघ्यांची भूमिका; कार्यकर्ते फक्त फोटोपुरते
आग लागल्यानंतर घटनास्थळी भेट देण्यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी रांग लागली होती. हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते येथे येऊन फक्त फोटो काढत होते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना कोणतीच मदत केली जात नव्हती. अग्निशमन दलाचे टॅंकर कमी पडत होते. मात्र, ते मागविण्यासाठी कोणीही तसदी घेत नव्हते. अग्निशमन जवानांनाही स्थानिक तरुणच मदत करत होते.

काही क्षणात संसार रस्त्यावर…
आगीची तीव्रता वाढल्यानंतर नागरिक हाताला मिळेल, ते घेऊन घराबाहेर पडत होते. महत्त्वाची कागदपत्रे, पैसे, भांडी, कपडे इतकेच नव्हे तर टीव्ही, कूलर, फ्रीज आदी साहित्यही बाहेर काढण्यात आले. हे सर्व साहित्य नागरिकांनी पुणे-मुबंई जुन्या महामार्गावर मांडले होते. यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर मांडल्याचे चित्र दिसत होते. काही गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे रस्त्यावर तसेच पुलावर उभे राहून आपला जळत असलेला संसार पाहत होते. डोळ्यांसमोर संसार जळताना पाहून कुटुंबांचे अश्रू अनावर झाल्याचे दिसत होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)