अग्नितांडवात पुसली गेली त्यांची ओळख

पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर सर्व कागदपत्रे जळून खाक


कागदोपत्री ओळख दाखवल्याशिवाय कशी मिळणार मदत?


शेकडो रहिवाशांपुढे उभा यक्ष प्रश्‍न

पुणे – पाटील इस्टेट येथे बुधवारी लागलेल्या भीषण आगीत शेकडो रहिवाशांचे संसार उध्वस्त झाले. मात्र, या पेक्षाही स्वत:चे अस्तित्त्व पुसले गेल्याचे दु:ख त्यांना जास्त आहे. या आगीत त्यांची ओळख असणारे पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रे जळाली. यामुळे त्यांच्याजवळ स्वत:ची अशी कागदोपत्री कोणतीच ओळख राहिलेली नाही. उध्वस्त संसार महापालिका, नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच स्वत:च्या बळावर उभा राहू शकतो. मात्र, पुन्हा कागदोपत्री स्वत:ची ओळख कशी निर्माण करायची हा यक्ष प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा आहे. कागदोपत्री ओळख दाखवल्याशिवाय कोणती मदत मिळू शकणार नाहीच, शिवाय मुलांच्या शैक्षणीक भविष्याचा प्रश्‍नही निर्माण होऊ शकतो.

पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये कष्टकरी व कामगार वर्ग रहातो. यामुळे घटनेच्यावेळी घरातील कर्ता व्यक्ती कामावर तर मुले शाळेत गेली होती. घरामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक होते. यामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच कामावर गेलेले रहिवासी आणि शाळेत गेलेल्या मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. घराच्या जागी जळालेल्या पत्र्यांचा ढिगारा पडलेला होता. यातूनही काही सापडते का? याची शोधाशोध रहिवासी घेत होते. मात्र, आग इतकी तीव्र होती की भांडी, दागिने आदी सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. यामुळे कागदपत्रे आणि रोकड त्यातून वाचने अशक्‍यच होते. रहिवाशांची तात्पुरती सोय महापालिकेच्या शाळेमध्ये करण्यात आली होती. यानंतर गुरुवारी पुन्हा नागरिक पत्र्याच्या ढिगाऱ्याखाली शोधाशोध करण्यास आले होते. महसूल विभागाने मोजणी सुरू केल्यावर नागरिक आपल्या घराची जागा दाखवण्यास जमले होते. मात्र, शेजारच्यांशिवाय त्यांच्याकडे स्वत:ची ओळख दाखवण्यासारखा दुसरा पुरावा नव्हता. यातच स्वत:च्या घराची सीमा सांगताना अनेकांचे वादही उद्‌भवत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)