‘प्रभात’चा दणका : महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील खुर्च्या जाग्यावर

नागरिकांच्या आसन व्यवस्थेचा प्रश्‍न सुटला
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या अचानक गायब झाल्यानंतर दैनिक “प्रभात’ने प्रशासनाच्या कारभारावर कोरडे ओढले होते. त्याचा धसका घेऊन महापालिका प्रशासनाने याठिकाणी काढलेल्या खुर्च्या पुन्हा ठेवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणे करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर अनेक बदल घडत आहेत. पालिकेतील तिसऱ्या मजल्यावर लोकप्रतिनिधींची दालने आहेत. शहराच्या कोणाकोपऱ्यातून प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नागरीक पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आवर्जून येतात. दररोज सर्वसामान्य नागरिकांची तिसऱ्या मजल्यावर रिघ लागलेली असते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, विविध पक्षांचे गटनेता तसेच विविध समित्यांचे सभापती यांच्यासमोर सतत नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना विश्रांतीसाठी किंवा बसण्यासाठी या मजल्यावर बाहेरील बाजूस आसन व्यवस्था केली होती. मध्यंतरी आसन व्यवस्थेसाठी ठेवलेल्या खुर्च्याच गायब झाल्या होत्या. नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे हा मुद्दा दैनिक “प्रभात’ने चांगलाच लावून धरला. याबाबत शहरअभियंता, भाजपचे पदाधिकारी यांच्याकडे सातत्याने विचारणा करून पाठपुरावा केला. कोणाच्या आदेशाने येथील खुर्च्या हटविण्यात आल्या? असा जाब विचारल्यानंतर याची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वी पुन्हा पूर्वी होत्या तशा रचनेत खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या बसण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर स्थायी समितीच्या बैठका घेण्यासाठी दिवंगत मधुकर पवळे सभागृह आहे. या सभागृहात महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांचे सत्कार महापौर, आयुक्तांच्या हस्ते केले जातात. सत्काराला उपस्थिती लावण्यासाठी निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे नातेवाईक येतात. त्यांना सभागृहात प्रवेश दिला जात नाही, म्हणून ते सभागृहाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खुर्च्यांवर बसतात. परंतु, या खुर्च्याच हटवून सर्वसामान्य नागरिकांच्या आसव्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांनी गडांतर आणले होते. मात्र, “प्रभात’च्या वृत्तामुळे हा प्रश्‍न कायमचा सुटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)