पिंपरी – अवघ्या चार पर्यवेक्षकांवर महापालिकेच्या शिक्षण विभागाचा गाडा ओढला जात होता. त्यामुळे या पर्यवेक्षकांना महापालिकेसह खासगी शाळांवर नियंत्रण ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अखेर नव्याने तीन पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
शहरात महापालिकेच्या 105 शाळा तर खासगी 527 आहेत. या शाळांची गुणवत्ता वाढ, शाळा तपासणी, शाळांच्या तपासणी, तक्रारी घेणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे, शाळांवर नियंत्रण ठेवणे, महापालिकेचे विविध उपक्रम राबविणे यासारखी असंख्य कामे पर्यवेक्षकांना करावी लागतात. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागात केवळ चार पर्यवेक्षक असल्याने त्यांना कामाचा भार सहन करावा लागत होता.
मागील काही दिवसात चार पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यामधील एक पर्यवेक्षक निवृत्त झाले तर दोघांची इतर ठिकाणी बदली झाली. यामुळे, पुन्हा शहरातील शाळांची जबाबदारी इतर पर्यवेक्षकांवर पडली होती. शहरात महापालिका व खासगी शाळांवर नियंत्रण ठेवताना पर्यवेक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तरीही या विभागातील कर्मचारी दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत होती. आता नव्याने पर्यवेक्षक भरल्याने शाळा सुधारण्याबाबतच्या काही त्रुटी, समस्या निश्चितपणे सुटण्यास मदत होणार आहे.
शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, शिक्षण विभागात सध्या चार पर्यवेक्षक आहेत. परंतु, कामाचा अतिरिक्त व्याप व शाळांची गुणवत्ता पाहता तीन पर्यवेक्षकांची नेमणूक केली जात आहे. यामुळे, इतर पर्यवेक्षकांवरील कामाचा व्याप कमी होऊन शाळांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा