…अखेर जिंती तलाव सांडव्याची गळती निघाली

कराड – जिंती तलावाच्या सांडव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. लोकसहभागातून सांडव्याची गळती काढल्याने वाया जाणारे लाखो लिटर पाणी तलावात साठून राहिल्याने उन्हाळ्यात निर्माण होणारी शेतीच्या पाण्याची टंचाई थांबणार आहे. या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

जिंती तलावाच्या सांडव्याची गळती व भिंतीवर वाढलेले वृक्ष तातडीने काढावेत, यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील व ग्रामस्थांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मोठ्या प्रमाणात गळती न काढल्यास पाणी वाया जाणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

-Ads-

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करुन दुरुस्ती व वृक्ष तोडीबाबत कार्यवाही सुरु केल्याची माहिती दिली. मात्र तूर्त लोकसहभागातून लिकेज थांबण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे जिंती तलावामधील पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून गळती काढण्याचा निर्णय घेतला.

या विधायक कामासाठी फक्त डिझेल खर्चावर विक्रम घाडगे यांनी जेसीबी व दिलीप पाटील यांनी ट्रॅक्‍टर उपलब्ध करुन दिला. माती, मुरुम व जेसीबीच्या साह्याने दोन तासाच्या प्रयत्नानंतर सांडव्याचे पूर्ण लिकेज थांबण्यात शेतकऱ्यांना यश आले. गळती काढली नसती तर सुमारे 2 ते 3 फुटांनी तलावाची पाणी पातळी कमी झाली असती. वाया जाणारे लाखो लिटर पाणी तलावात साचून राहिल्याने शेतीला आणखी एक महिना उन्हाळ्यात पुरेल इतका पाणी साठवण्याच्या यश आले आहे.

तलावावरती जिंती व परिसरातील सुमारे 500 एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. गळती बंद झाल्याने या सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पाणी वाचवण्याच्या अत्यंत महत्वाच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक अशोकराव पाटील, पोलीस पाटील संतोष पाटील, सोसायटीचे सदस्य संभाजी पाटील, आनंदराव लामणे, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संतोष भगवान पाटील, दत्तात्रय पाटील, संभाजी चव्हाण, शिवाजी पाटील आदींनी परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)