अखर्चित निधीबाबत वस्तुस्थिती जाणून द्या मग बोला- अध्यक्ष विखे

शासनाने वाळू व पाणी द्यावे, कामे मार्गी लागतील
प्रभात वृत्तसेवा
नगर – जिल्हा परिषद अध्यक्षांना अधिकारच ठेवले नाही. त्यामुळे काय कामे करणार असा प्रश्‍न आहे. अखर्चित निधी का राहतो याची वस्तूस्थिती जाणून द्या, मगच त्या विरोधात बोला असे प्रत्युत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांना दिले. त्यामुळे वाळू आणि पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.शासनाने वाळू व पाणी द्यावी. म्हणजे विकास कामे मार्गी लागतील, असे त्या म्हणाल्या.
विखे म्हणाल्या की, पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वाळू देखील मिळत नाही. त्यामुळे विकास कामे मार्गी लावण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी वस्तूस्थिती समजून घेवून बोलावे असे त्या म्हणाल्या. यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांना जिल्हा परिषदेला येणार अडचणी व जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात होत असलेल्या कपातीबाबतचे निवेदन अध्यक्ष विखे यांच्यासह उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अजय फटांगणे, उमेश परहर यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की. जलसंपदा विभागकडून शेती व पिण्याचे पाणी यासाठी करणाऱ्या येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाणीपट्टीची वसुली शेतकरी व ग्रामपंचायतीकडून जलसंपदा विभागाने करणे अपेक्षित असतांना ती जिल्हा परिषदेमार्फत केली जात आहे. जिल्हा परिषद अधिनियमात पाणीपट्टी पैकी 20 टक्‍के रक्‍कम जिल्हा परिषदेला देण्याची तरतूद आहे. परंतू सन 2010 पासून जलसंपदा विभागाकडून ही रक्‍कम न देता परस्पर पाणीपट्टीच्या नावाखाली जमा करू घेत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला जलसंपदाकडून मिळणाऱ्या 20 टक्‍के उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
पाणीयोजना हस्तांतरीत झालेल्या नसतांनाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून परस्पर 5 कोटी 14 लाख रुपये मुद्रांक शुल्कापोटी जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या रक्‍कमतून घेण्यात आले आहे. जीवन प्राधिकरणाकरून पाणीयोजना तयार केल्यानंतर त्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात येतात. परंतू योजना हस्तांतरीत झालेल्या नसतांनाही त्या योजनांच्या वीजबिलांची भुर्दंड जिल्हा परिषदेच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका जिल्हा परिषदेला बसत आहे. सर्व शिक्षा अभियानातंर्गत शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी मोठा निधी देण्यात येत होता. परंतू हा निधी बंद करण्यात आल्याने नव्याने शाळा खोल्या उभारणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या खोल्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये बसावे लागत आहे. काही शाळा तर उघड्यावर भरत आहे. त्यामुळे शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करू देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)