अक्षय तृतीया “सोनियाचा दिनु’

  • सोने खरेदीला पसंती : गुंतवणुकीच्या दृष्टीने मागणी वाढली

पिंपरी (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृतीमध्ये महिलांच्या साज श्रृंगाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रृंगार म्हटलं की सोने अन सोन्या-चांदीचे दागिने खरेदी आलीच. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा आहे. पण, सोन्यावर लादलेल्या करांमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहक सोने खरेदी करताना गांभीर्याने विचार करतात. “गुढी पाडवा’पासून लग्न सराईत सोन्याची वाढलेली मागणी पाहता अक्षय तृतीयेचा मुहूर्तही सोन्यासारखा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांना खूप चांगले “रिटर्न्स’ मिळत असल्यामुळे ग्राहकांची ओढा सोने खरेदीकडे वाढला आहे.

गेल्या दहा ते वीस वर्षांतील अक्षय तृतीयेच्या दिवशी असलेल्या सोन्याच्या किंमती पाहता आलेख लक्षणीय चढता आहे. मात्र, त्या तुलनेत मागणीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. विषेशत: गरीबांपासून ते श्रीमंतांतपर्यंत सोने ही सर्वांचीच पसंती आहे. सणा-वाराला घालून हौस पुरी करुन देणारे सोने अडी-अडचणीच्या काळात भक्‍कमपणे पाठिशी उभे राहते, असे नागरिकांकडून सांगीतले जाते.
सध्या गुंतवणूक म्हणून एफडी, सदनिका, जमीन, शेयर्स, मॅच्युअल फंड असे काही पर्याय आहेत. पण, आजही सर्वसामान्यांसाठी सोने हीच सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता तज्ज्ञ मंडळीही सोन्यालाच प्राधान्य देत आहेत. एकीकडे कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिका आणि रशिया मध्येही वाद धुमसत आहे. अमेरिका आणि चीनमध्येही “ट्रेड वॉर’ सुरु आहे. अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या बाबतीत सशक्‍त मानल्या जाणाऱ्या देशांमध्येही सध्याची परिस्थिती म्हणावी तेवढी बरी नाही. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक म्हणून इतर पर्यायांच्या तुलनेत सोने सरस ठरत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या दरात वाढ आणि स्थिरता
गेल्या वीस वर्षांचे दर पाहिल्यास सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षामध्ये सोन्यामध्ये मोठे चढ-उतार झालेले नाहीत. 20 वर्षांपूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल 1998 रोजी सोन्याचा दर 4 हजार 25 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. पुढील आठ वर्षातच म्हणजे 2006 च्या अक्षय तृतीयेला सोन्याचा दर 9 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम वर जाऊन पोहचला. दोनच वर्षात अर्थात 2008 सालच्या अक्षय तृततीयेला सोन्याने 11 हजाराचा टप्पा ओलांडला. यानंतर सातत्याने सोन्याच्या दरात वाढच होत राहिली. गेल्या 20 वर्षांमध्ये अक्षय तृतीयेला गेल्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत सोन्याचा दर केवळ दोनदाच कमी झाला आहे. खऱ्या अर्थाने अक्षय तृतीयेला खरेदी केलेले सोने “अक्षय्य’ ठरले. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 29 हजारांच्या आसपास होता तो यावर्षी थेट सोन्याचा दर 32 हजारापर्यंत पोहचला आहे.

आणखी दर वाढण्याची शक्‍यता
सराफा व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढणार आहेत. यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्याच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्‍यता आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी 15 ते 20 टक्‍क्‍याने विक्रीत वाढ होऊ शकते. बाजारातील उलथापालथ काहीशी मंदावली आहे. गेल्यावर्षी मान्सून चांगला होता. यंदाही चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे सोन्याची विक्री वाढेल. तसेच औद्योगिक क्षेत्रातही सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याने भविष्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. लग्नसराईत दागिन्यांच्या मागणीसोबतच गुंतवणूक म्हणून सोने-चांदीचे शिक्‍के, वेढण्यांची मागणी जास्त दिसत आहे.

अक्षयतृतीया वर्ष दर
28 एप्रिल 2017 28861
09 मे 2016 29860
21 एप्रिल 2015 26938
02 मे 2014 28865
13 मे 2013 26829
24 एप्रिल 2012 28852
06 मे 2011 21736
16 मे 2010 18167

यावर्षी अक्षय तृतीयेला सोन्याच्या विक्रीत 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. भविष्यात सोन्याचा भाव ही चांगलाच वाढण्याची शक्‍यता असल्याने सोने खरेदीकडे कल वाढला आहे. त्यात पुढील महिना अधिक महिना असल्यानेही सोन्या-चांदीच्या खरेदीत वाढ होणार आहे.
– विलास महादेव भांबुर्डेकर,
संचालक भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स.
—–
सोन्याचे 24 कॅरेटचे दर 32 हजार तर दागिन्यांचे दर 30 हजार रुपये असण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पाहता सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता असल्याने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला विक्री वाढू शकते.
– दिलीप सोनिगरा, संचालक, दिलीप सोनिगरा ज्वेलर्स.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)