अक्षय्य तृतीयेमुळे देशभर सोने खरेदीत वाढ

मुंबई- गेल्या काही वर्षापेक्षा या वर्षी सोन्याचे दर जास्त आहेत. मात्र, तरीही या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या खरेदीत वाढ झाली असल्याचे दागिने उत्पादकांनी सांगितले. टायटनच्या दागिने विभागाचे उपाध्यक्ष संदीप कुलहल्ली यांनी सांगितले की, गेल्या वर्षापेक्षा या वर्षी दागिन्याच्या विक्रीत बरीच वाढ झाली आहे. लोक या सणाबरोबरच लग्नासाठी सोने खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याणरामन यांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी आमच्या विक्रीत 25 टक्‍के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी लोकांत खरेदीचा जास्त उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सोन्याचे दर जास्त पातळीवर असूनही खरेदीचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. त्याचबरोबर जीएसटी आणि इतर कारणामुळे लोक असंघटित उत्पादकापेक्षा संघटित उत्पादकांकडून दागिने खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. दुपारनंतर खरेदीचा जोर जास्त वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळीच खरेदीचा बराच जोर होता. खरेदीसाठीचे मुहूर्त दुपारनंतर सुरू होणार होते. दुपारी आणि सायंकाळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, अक्षय्य तृतीयेला आणि नंतर सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू घेताना परवानाधारक दुकानातून हॉलमार्क असलेले दागिने व वस्तू घ्याव्यात, असे आवाहन भारतीय मानके विभागाने केले आहे.

सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू यांच्या शुद्धतेच्या पारखणीसाठी भारतीय मानके विभाग हॉलमार्क पद्धत राबवते. हॉलमार्कचे चिन्ह ग्राहकांना दागिने-वस्तूंच्या खरेपणाबाबत हमी देते. शुद्धतेबाबत, खरेपणाबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित विक्रेत्याचा भारतीय मानके विभागाचा परवाना रद्द होऊ शकतो तसेच कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

सोने हॉलमार्किंग संदर्भात भारतीय मानकांमध्ये भारतीय मानके विभागाने सुधारणा केली असून 1 जानेवारी 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हॉलमार्क असलेले 14 कॅरट, 18 कॅरट आणि 22 कॅरटचे सोन्याचे दागिनेही कॅरटच्या नोंदीसह उपलब्ध असतील, असे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)