नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव : इच्छुकांच्या मुलाखती, राष्ट्रवादी आज नाव जाहीर करणार
अकोले – अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अडीच वर्षांचा कालावधी संपल्याने येत्या 23 मे रोजी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपद तेही ओबीसी महिलेला आरक्षणाने मिळणार असल्याने आज राजकीय पडद्याआड वेगवान घडामोडी घडल्या. शुक्रवारी नगराद्यक्षपदासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी सकाळी नाव जाहीर केले जाईल, अशी शुक्रवारी दुपारी अगस्ती कारखाना कार्यस्थळावर घोषणा केली.
नगरपंचायत अस्तित्वात येवून अडीच वर्षे झालेले आहेत. या काळात पहिल्यांदा ऐतिहासिक नगराध्यक्षपदाची संधी मिळालेले के. डी. धुमाळ व उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी हे दोघेही पायउतार होणार हे निश्चित आहे. प्रकाश नाईकवाडी कायम राहणार की बाळासाहेब वडजे, नामदेव पिचड की परशुराम शेळके यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार याबाबत अनिश्चितता आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पीठासीन अधिकारीपदावर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांची नियुक्ती झालेली आहे.नगराध्यक्षपदासाठी 18 तारखेला दुपारी दोन वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 22 तारखेला माघार घेता येणार आहे. उप नगराध्यक्ष पदासाठी 22 तारखेला अर्ज दाखल करता येणार आहे. पीठासीन अधिकारी या पदाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत वेळ व कालावधीचे निर्णय जाहीर करणार आहेत.
अगस्ती कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठी माजी मंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली. त्यांनी सर्व नगरसेवकांची मते जाणून घेतली. शुक्रवारी सकाळी पदासाठी नाव जाहीर केले जाईल, असे पिचड यांनी जाहीर केले.
ओबीसी महिला म्हणून संगीता शेटे, स्वाती शेणकर, निशीगंधा नाईकवाडी, कल्पना चौधरी व अनिता गायकवाड यांचा समावेश आहे. या पदासाठी कोणाची वर्णी लागते, याबाबत कामालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवकाचे (पुरुष) नाव निश्चित होईल, असे जाणकारांचे मत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा