अकरावी प्रवेशाच्या 30 हजार 743 जागा रिक्‍त

97 हजार 435 इतकी क्षमता : 66 हजार 692 प्रवेश

पुणे – अकरावी प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर प्रवेशाची अधिकृत आकडेवारी प्रवेश समितीने सोमवारी जाहीर केली. यंदा अकरावीसाठी 97 हजार 435 इतकी प्रवेशाची क्षमता होती. त्यापैकी 66 हजार 692 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, तब्बल 30 हजार 743 अकरावीचे प्रवेश रिक्‍त असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्यात 90 टक्‍के प्रवेश झाल्याचा शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. या आकडेवारीवरून जवळपास 69 टक्‍के अकरावी प्रवेश झाल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा अकरावी प्रवेश कोणताही गोंधळ न होता सुरुळीत झाले. केंद्रीय प्रवेश पद्धतीने ऑनलाईनद्वारे अकरावी प्रवेशासाठी नियमित चार प्रवेश फेरी घेण्यात आल्या. त्यानंतर एक विशेष फेरी झाली. त्यानंतरही आणखी काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्याचा विचार करून “प्रथम प्राधान्यानुसार प्रथम प्रवेश’ असे चार फेरी झाल्या. या व्यतिरिक्‍त द्विलक्षी अभ्यासक्रमाचे दोन स्वतंत्र प्रवेश फेरी घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. तरी एकूण प्रवेश क्षमतेचा विचार करता तब्बल 30 हजार 435 प्रवेश रिक्‍त राहिले आहेत.

विज्ञान शाखेचे सर्वाधिक रिक्‍त जागा
अकरावी प्रवेशाची आकडेवारीवरून यंदाही कला शाखेचे सर्वाधिक जागा रिक्‍त राहण्याची शक्‍यता होती. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेचे प्रवेश सर्वाधिक रिक्‍त असल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यात विज्ञान शाखेचे 60 टक्‍के प्रवेश झाले असून, 40 प्रवेश रिक्‍त राहिले आहेत. विज्ञान शाखेचे 15,721 प्रवेश रिक्‍त राहिले आहेत, ही चितेंची बाब आहे. कला शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमातून 56 टक्‍के प्रवेश झाले असून, एकूण 6 हजार 53 जागा रिक्‍त राहिल्या आहेत.

वाणिज्य प्रवेशाची सर्वाधिक पसंती
अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होण्यापूर्वीच यंदा वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे कलचाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य शाखेचे अकरावीचे 80 टक्‍के प्रवेश झाले आहेत. तर, मराठी माध्यमाच्या 84 टक्‍के प्रवेश झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विज्ञान, कला शाखेपेक्षा वाणिज्य शाखेचे सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. मात्र, तरीही वाणिज्य शाखेचे दोन्ही माध्यम मिळून 7 हजार 376 जागा रिक्‍त राहिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)