अकरावी कलेचे गुण अपलोड झालेच नाहीत

अकरावी प्रवेश समितीचे बोर्डाला पत्र: कलेच्या गुण मिळालेल्यांची वेगळी यादी करणार
पुणे,दि.19 (प्रतिनिधी)- अकरावी प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांसमोर एक नवी अडचण निर्माण झाली असून ज्या विद्यार्थ्यांना कलेचे गुण मिळालेले आहेत ते प्रवेश अर्ज भरताना दिसतच नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळेच आता याबाबत अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने तातडीने पाऊले उचलत याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पत्र लिहून ही बाब कळवली आहे.
अकरावी प्रवेशाचा अर्ज भाग दोन भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पहिले दोन दिवस याला फारसा प्रतिसाद आला नाही मात्र सोमवारी सर्वाधिक अर्ज भरुन झाले असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेशाच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली. अकरावी प्रवेशाचे आतापर्यंत 9 जार 408 अर्ज पूर्ण भरुन झाले आहेत. तर भाग एक 68 हजार 850 विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. काही कलेच्या विद्यार्थ्यांबाबत जो प्रश्‍न निर्माण झाला आहे तो लवकरच सोडवला जाणार असून त्यासाठी त्यांची स्वतंत्र यादी केली जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तात्काळ याबाबत बोर्डाला पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आहे. लवकरच ही बाब सुधारण्यात येईल व विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेच्या गुणांसहित त्यांचे गुण अकरावीच्या संकेतस्थळावर दिसतील. दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरु असून विज्ञान शाखेचे सुधारित कट ऑफही जाहीर करण्यात आले आहेत.
मिनाक्षी राऊत, सचिव
अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

अकरावी प्रवेश अर्जांची संख्या
भाग एक भाग दोन
पूर्ण 75,013 28,982
अपूर्ण 4,584 1,705
एकूण 79,597 30,687

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)