अकरावीचे कट ऑफ फसवे?

महाविद्यायांची चौकशी करून मगच प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे – अकरावी प्रवेशादरम्यान विविध क्‍लासेसचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडे वळविण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांनी सुरु केला आहे. म्हणूनच काही ठिकाणी विनाअनुदानित महाविद्यालयांचे कट ऑफ हे अनुदानित महाविद्यालयांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या काहीच दिवसांत सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारी माहितीपुस्तिकाही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या माहितीपुस्तिकेत प्रत्येक महाविद्यालयाला किती शुल्क, कोणते विषय शिकविणार, कोणत्या तुकड्या अनुदानित, कोणत्या विनाअनुदानित अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.
अनुदानित महाविद्यालयाला शासनाकडून अनुदान मिळत असल्याने त्या महाविद्यालयांचे शुल्क कमी असते. तर विनाअनुदानित महाविद्यालये किंवा तुकड्यांना अनुदान मिळत नसल्याने त्यांचे शुल्क अधिक असते. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयांना सर्वाधिक मागणी असते. अनेक विद्यार्थी पहिला पसंतीक्रम हा अनुदानित महाविद्यालयांना देतात. मात्र यंदाच्या माहितीपुस्तिकेवरुन दिसून आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांनी किंवा तुकड्यांचा कट ऑफ अधिक आहे. म्हणजेच अधिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी हे अनुदानितपेक्षाही विनाअनुदानित महाविद्यालयांकडे अधिक प्रमाणात वळत आहे.
याबाबत शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार अनेक महाविद्यालये ही विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. प्रत्येक वेळी विद्यार्थी हा नविन असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी माहिती असतातच असे नाही. त्याचाच फायदा काही महाविद्यालये उचलतात. विद्यार्थ्यांना खासगी क्‍लासच्या शुल्कात सूट आदी गोष्टी सांगातात. त्यामुळे गुणवत्ता असलेले विद्यार्थीही विनाअनुदानित महाविद्यालयांकडे वळतात.
शहरातील काही कोचिंग क्‍लासेस व विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयांमध्ये छुप्या करारांमध्ये वाढ झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या करारानुसार क्‍लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला जातो. यातील बहुतेक विद्यार्थी 75 ते 80 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेले असतात. प्रवेश मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्यासाठी सशुल्क सवलत दिली जाते. या सवलतीमुळे महाविद्यालयांचे कटऑफही वाढते. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या या करारांमुळे यंदाही विद्यार्थ्यांची कटऑफमुळे फसगत होण्याची शक्‍यता आहे. तसेच यंदाच्या माहितीपुस्तिकेमध्ये महाविद्यालयांसमोर देण्यात येणारे कटऑफ मागील वर्षीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे दिले जाणार आहेत. मागील वर्षी पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी एक बेटरमेंटची संधी देण्यात आली होती. त्यामुळे माहितीपुस्तिकेत दुसऱ्या फेरीतील कटऑफ देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारणांमुळे कटऑफ पाहून संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी पसंती दर्शविणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते.

माहितीपुस्तिकेमध्ये देण्यात येणारे कटऑफ मागील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचे असतील. हे कटऑफ केवळ मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना संबंधित महाविद्यालयाची माहिती माजी विद्यार्थ्यांकडून धेणे आवश्‍यक आहे. महाविद्यालयातील सोयीसुविधा, शिक्षक, अध्यापन, घरापासून महाविद्यालयाचे अंतर अशा गोष्टींची माहिती घेवूनच पसंतीक्रम देणे अपेक्षित आहे.
– मीनाक्षी राऊत, सचिव
अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)