अंध:कार (अग्रलेख) 

भ्रष्टाचार, पूर्णत: संपुष्टात आलेली नितीमत्ता आणि औषधालाही शिल्लक न राहिलेली माणुसकी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत गेल्या दोन आठवड्यात उघड झालेली घृणास्पद प्रकरणे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका खासगी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या महिला आणि बालिका आश्रमातील स्वच्छ पांढऱ्या भिंतीआडचे धक्‍कादायक काळे वास्तव समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील देवरीया आणि आता प्रतापगड येथेही असलेच प्रकार; त्याहीपेक्षा अधिक घृणास्पदपणे सुरू असल्याचे उजेडात आले. भ्रष्टाचार, अनाचार आणि त्यातून निर्माण झालेल्या सडक्‍या कुजक्‍या यंत्रणेने आपल्या देशाला किती खोलपर्यंत पोखरले आहे, याची यातून प्रचिती येते.

“रॉयटर’ नावाच्या विदेशी संस्थेने भारताच्या आणि एकूणच जगातील महिलांच्या स्थितीसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार भारत हा महिलांसाठी जगातील सगळ्यांत धोकादायक देश बनला असल्याचा निष्कर्ष अगदी ठामपणे मांडण्यात आला होता. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर खरे तर आत्मचिंतन करणे गरजेचे होते. कोणाला आपला देश इतका धोकादायक म्हणावासा का वाटतो, याचा विचार करत उत्तर शोधण्याची आवश्‍यकता होती. तथापि, समोरच्याचा मुद्दाच खोडून काढायचा, हा भारतीय गुण येथेही कामी आला. 

मध्यंतरी “रॉयटर’ नावाच्या विदेशी संस्थेने भारताच्या आणि एकूणच जगातील महिलांच्या स्थितीसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार भारत हा महिलांसाठी जगातील सगळ्यांत धोकादायक देश बनला असल्याचा निष्कर्ष अगदी ठामपणे मांडण्यात आला होता. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर खरे तर आत्मचिंतन करणे गरजेचे होते. कोणाला आपला देश इतका धोकादायक म्हणावासा का वाटतो, याचा शांतचित्ताने विचार करत उत्तर शोधण्याची आवश्‍यकता होती. तथापी, समोरच्याचा मुद्दाच खोडून काढायचा, हा खास भारतीय गुण येथेही कामी आला. “कोण ही रॉयटर संस्था? त्यांचा अभ्यास काय? जगात बघा काय आणि कसे चालले आहे;’ अशी खिल्ली उडवली गेली. “केवळ 550 तज्ञ 130 कोटींचा भारत महिलांसाठी सगळ्यांत धोकादायक आहे, असे कसे म्हणू शकतात; आणि त्यांनी म्हटले म्हणून, आम्ही तरी ते खरे का मानावे,’ असे प्रश्‍न विचारले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिका, फ्रान्स आणि स्वीडन या देशांतील महिलांविरुद्धच्या अत्याचारांची आकडेवारी भारतापेक्षा कैक पटीने जास्त असल्याचे आकडेवारीसह मांडले गेले. “रॉयटर’च्या अहवालाला केराची टोपली दाखवली गेली आणि “मेरा भारत महान, नही सहेंगे यह अपमान’ अशा थाटात हा विषयच फेटाळला गेला. “भारतात दर सहाव्या तासाला एक महिला बलात्काराची शिकार ठरते’, असे कालच भारतातल्या एनसीबीच्या अधिकृत अहवालात म्हटले आहे. तेही नोंद झालेले गुन्हे आहेत. नोंद नसलेल्या गुन्ह्यांचे काय? त्याच्या तपशीलात जाण्याची कोणाला गरज नाही. “कोई भी देश परफेक्‍ट नही होता’, असे एकदा म्हटले की, सगळे पॉझिटीव्हली घ्यायचे. असा हा आत्मवंचनेचा खेळ सुरू असताना मग खरेच आपण महान आहोत का, आणि खरेच आपण परफेक्‍टच्या जवळ जाण्याच्या लायकीचे तरी आहोत का, असे प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या घटना, मुझफ्फरपूर, देवरीया आणि प्रतापगढ येथे उघड होतात.

ब्रिजेश ठाकुर नावाचा महाभाग महिलांसाठी चालवत असलेल्या आश्रमात महिलांवर लैंगिक अत्याचार होत होते. त्यात बिहारच्या समाज कल्याण मंत्र्यांच्या पतीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. देवरीयातही अशाच बालिका आणि महिलांसाठीच्या सुधारगृहातून 42 पैकी 18 महिला गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथून पळ काढलेल्या एका दहा वर्षीय मुलीने दिलेली माहिती हादरवणारी आहे. “रोज रात्री एक लाल आणि काळ्या रंगाची गाडी यायची आणि काही मुलींना घेऊन जायचे. सकाळी जेव्हा त्या मुली परत यायच्या तेव्हा त्या रडत असायच्या. संध्याकाळी चार वाजता परत एक गाडी यायची व काही मुलींना घेउन जायची,’ हे त्या मुलीने सांगितलेले सुधारगृहाचे वास्तव भ्रष्ट यंत्रणेच्या आश्रयाने चालणाऱ्या या आश्रय संस्थांचा समाजसेवेचा विद्रुप चेहरा दर्शवणारे आहे. गिरीजा त्रिपाठी नावाची एक महिला “मॉं विंध्यावासिनी’ संस्थेच्या अंतर्गत निराधार मुली आणि महिलांसाठी हे निवारागृह चालवते. तेथील हा प्रकार.

त्रिपाठीबाईंच्या याच संस्थेमार्फत वृद्धांसाठी आश्रम चालवला जात होता. त्याकरता दोन मजली इमारत व 15 सुसज्ज खोल्याही बांधण्यात आल्या होत्या. मात्र या खोल्या ज्या वृद्धांसाठी बांधल्या होत्या, व त्याकरता सरकारकडून अनुदान घेतले जात होते, त्या वृद्धांची राहण्याची व्यवस्था प्रत्यक्षात आश्रमाच्या मागच्या गोठ्यात करण्यात आली होती. यातल्या काहींची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी इस्पितळात उपचार करण्यासही नकार देण्यात आला. कारण काय, तर म्हातारपणावर कोणता इलाज नसतो. आकडेवारी समोर आल्यावर अविश्‍वास दर्शवताना आपल्या खऱ्या आणि अंध:कारातच असलेल्या या भारताचेही दर्शन आपण घेतले पाहिजे. अनाथ, कोणत्यातरी कारणाने निराधार, बेसहारा झालेल्या व्यक्तींची आबाळ होउ नये, यासाठी असली सुधारगृहे अथवा आश्रम चालवले जातात.

काही सरकारकडून तर काही सरकारच्या मदतीने. हेतू चांगला होता. मात्र भ्रष्टाचाराने सगळेच पोखरून टाकले. जगापासून रक्षण होण्यासाठी बांधलेल्या आश्रमशाळांतच महिला व चिमुरड्यांचे भक्षण होत आहे. जेथील प्रकार समोर आले तेथे थातुरमातुर कारवाई होते. ज्यांचे पाप अद्याप झाकलेले आहे, तेथे सगळे आलबेल. त्याची तपासणी करण्याचे, आपली जबाबदारी पार पाडण्याचे कोणाला काही सोयरसुतक नाही. पुण्यातही गेल्या वर्षभरात धार्मिक शिक्षणसंस्था अथवा आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या लैंगिक शोषणाचे तीन प्रकार समोर आले. देशाच्या अन्य भागातही ते होत असणारच आहेत. ते रोखण्यासाठी पावले का उचलली गेली नाहीत. पूर्वीही अशा घटना समोर आल्या होत्या, त्यातून काहीच बोध आपण का घेतला नाही, असे प्रश्‍न अनेक आहेत. पण त्यांची उत्तरे देणाऱ्यांना नितीमत्तेची चाड असली पाहिजे. ती जर नसेल तर हा अंध:कार सर्वव्यापी होण्यास वेळ लागणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)