अंदाजपत्रकाची चिरफाड!

  • उपसूचनांचा भडीमार ः सहा तास चर्चेनंतर 300 कामांची घुसखोरी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सहा तासाच्या चर्चेनंतर नगरसेवकांकडून उपसूचनांचा भडीमार करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सुमारे 700 उपसूचना घेऊन जवळपास 300 कोटींच्या अंदजपत्रकीय तरतुदींमध्ये अदला-बदल करण्यात आली आहे. उपसुचनांचा भडीमार पाहता प्रशासन आणि स्थायी समितीने केलेल्या अंदाजपत्रकाची चिरफाड झाली आहे.

महापौर नितीन काळजे अर्थसंकल्पीय विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अर्थसंकल्पावर जवळपास मंगळवारी (दि. 20) दिवसभरात दोन वेळा एकत्रीत अशी तब्बल सहा तास चर्चा झाली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ही सभा सुरूच होती. चर्चेअंती अखेर उपसूचनांव्दारे कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या तरतुदींमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. मूळ चार उपसूचनांतर्गत सुमारे 700 उपसूचना अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्यातून 300 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यासाठी 357 व 88 उपसूचनांचा समावेश आहे. अर्थसंकल्पातील विविध कामांच्या तरतुदींमध्ये वाढ-घट करण्यासाठी तब्बल 103 उपसूचनांचा समावेश आहे. तर, विशेष योजनांसाठी 42 उपसूचना दिलेल्या आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने सांगवी-बोपोडी पूल, नाशिक फाटा-वाकड एचसीएमटीआर रस्ता विकसित करणे, पिंपळे सौदागर पवना नदीवर पूल बांधणे, वाकड-हिंजवडी बीआरटी रस्ता विकसित करणे, औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर वाय जंक्‍शन विकसित करणे, शहरातील विविध ठिकाणच्या उच्चदाब वाहिन्या स्थलांतरित करणे, सांगवीतील औंध रुग्णालयात अतिथीगृह उभारणे, नदीच्या बाजुने भिंत बांधणे, भाजी मंडई विकसित करणे यांसारख्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची फिरवाफिरव करण्यात आली आहे. यापैकी योग्य-अयोग्य उपसूचना दोन दिवसांत लेखा विभाग ठरविणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. 23) तहकूब अर्थसंकल्पीय उपसूचनांचा अंतर्भाव करून अर्थसंकल्प मंजूर केला जाणार आहे.

वाकड ते हिंजवडी मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी कस्पटे वस्ती (वाकड) ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. शिवाय, वाकडमधून हिंजवडीला जोडणारे पर्यायी रस्ते देखील निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी वाकडपासून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल, रोटरी, ग्रेड सेपरेटर विकसित करण्याच्या कामासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने उपसुचनेव्दारे केली आहे. उपसूचनांद्वारे वाकड येथील रस्त्यांच्या कामांवर खर्चाची तरतुदींत बदल सुचविण्यात आले आहेत.

आयुक्तांचे धोरण बासनात…
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पातून कामांसाठी टोकन पध्दत बंद करण्याचे धोरण आखले होते. त्यावरून हर्डीकरांनी स्वत:ची पाटही थोपटून घेतली होती. त्यामुळे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले होते. मात्र, अर्थसंकल्पावर उपसूचनांचा पाऊस पाडत सत्ताधाऱ्यांनीच अनेक कामांसाठी टोकन तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या धोरणाला हरताळ फासला गेला आहे. यावरून सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसतून येत आहे. यामुळे पालिकेचा कारभार भरकटण्याची चिन्हे दिसत आहेत. टोकन तरतुदींसंदर्भात आयुक्तांचे धोरण बासनात गुंडाळले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)