अंथरुणाला खिळलेल्या तरुणीला मदतीचा ओघ सुरू

तळेगाव-दाभाडे – अंथरुणाला खिळलेल्या मधूला मदतीची गरज मथळ्याचे वृत्त दै. “प्रभात’ ने गुरुवार दि. 15 रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घूेन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी मधूच्या वैद्यकीय उपचारासाठी पुढाकार घेतला. डॉ. लक्ष्मण कार्ले यांनी मधूच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मदत केली. मधूच्या बहिणीला रोजगार उपलब्ध करून दिली. मधुच्या आजारावर डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल पिंपरी येथे उपचार सुरू झाले.

मधु ब्रिजेश शर्मा (वय 19, रा. माळवाडी, ता. मावळ. मूळगाव जारंगा, ता. बसेडी, जि. धोलपूर, राजस्थान) हिचे वडील 6 नोव्हेंबर 2012 ला अपघातात मयत झाले. भाड्याच्या खोलीत अंधारातच जगणारी मधू कमरेच्या खाली हाडांचा आजाराने दोन वर्षांपासून अंथरुणावर खिळली आहे. कर्ता पुरुष नसल्याने मधूची आई धुणी-भांडीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवत असते. मधूच्या काळजीने शर्मा कुटुंब पूर्णतः खचले होते. तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शंकरराव शेळके यांनी मधूच्या कुटुंबाची भेट घेवून डॉ. लक्ष्मण कार्ले यांना मधूच्या घरी पाठवून आजाराची लक्षणे व औषधोपचाराची माहिती घेतली. त्यांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी वीज बील भरले व घरातील किराणा दिला व मधूची बहिण मनीषा हिला त्यांच्या कार्यालयात नोकरी दिली. मधुच्या आजारावर डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल पिंपरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हनुमंत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी विकास कोलते, परिचारिका रेशमा भुजबळ, डॉ. लक्ष्मण कार्ले, माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, सदाशिव बांगर प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, मधुच्या आजाराविषयी सर्व वैद्यकीय चाचण्या सुरु केल्या असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.

-Ads-

माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके म्हणाले, समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मदतीचा हात देणे, हीच खरी माणुसकी आहे. शर्मा कुटुंबावर आलेली वेळ कोणावरच येवू नये. अंधारात दीड वर्ष उदरनिर्वाह कसा गेला, हाच प्रश्‍न आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)