अंत्योदय योजनेसाठी 263 गावांची निवड

1 कोटी कुटुंबे दारिद्रयरेषेच्यावर येणार : जिल्ह्यात पहिला टप्पा

पुणे – केंद्र शासनाच्या वतीने मिशन अंत्योदय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिशनअंतर्गत 2019 पर्यंत देशातील लाखो ग्रामपंचायती दारिद्रयमुक्‍त करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे; तसेच योजना राबविल्यामुळे 1 कोटी ग्रामीण कुटुंबे दारिद्रयरेषेच्यावर आणण्यास मदत होणार आहे. मिशन अंत्योदयअंतर्गत राज्याला 5 हजार 227 ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. दरम्यान, अभियानातील पहिल्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्यातील 263 गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉ. दिनेश डोके यांनी दिली आहे.

शासनाच्या मिशन अंत्योदय अभियानांतर्गत राज्यासह प्रत्येक जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबाला सक्षम बनविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. अभियानात निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये हागणदारीमुक्‍त ग्रामपंचायत, दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती स्वयंसहाय्यता बचत गट कार्यरत असलेली ग्रामपंचायत, जलसंधारण अभियान सुरू असलेली गाव, सासंद आदर्श ग्राम योजनेतंर्गत निवडलेली ग्रामपंचायत, रुरलबर्न क्‍लस्टर योजनेतंर्गत निवडलेली ग्रामपंचायत, तंटामुक्‍त गाव, राज्य शासनाकडून विशेष लाभासाठी निवडण्यात आलेली ग्रामपंचायत, यशवंत पंचायत अभियान पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्राधान्य दिले जाणार आहे.

दरम्यान, निकषामधील अंतर्भूूत असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासंदर्भात ग्रामपंचायतींच्या सभोवतालच्या 10 ग्रामपंचायतींच्या समूहाचा प्राधान्याने अंतर्भाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना योजनेसंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 100 टक्‍के दारिद्रयमुक्‍त करण्यासाठी 263 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बारामती तालुक्‍यातील 19, दौंड 15, इंदापूर 21, आंबेगाव 19, पुरंदर 17, खेड 30, मुळशी 18, जुन्नर 27, भोर 29, वेल्हा 13, हवेली 19, शिरूर 17, मावळमधील 19 गावांचा समावेश करण्यात आला आहे. अभियानासाठी 256 गटसमन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)